
नोकरी, व्यवसाय तसेच आर्थिक परिस्थितीमुळे इंजिनीअर बनण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठात पार्टटाईम इंजिनीअरिंग अभ्यासक्रम सुरू होणार कधी, अशी विचारणा होत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये झालेल्या आभासी सिनेटमध्ये युवासेनेकडून पार्टटाईम इंजिनीअरिंग अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. सदर प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरूंनी दिले, मात्र दोन वर्षांचा कालावधी होत आला तरी याबाबत विद्यापीठाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.
काही वेळा इच्छा असूनही विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग करता येत नाही. विद्यार्थी डिप्लोमा अभ्यासक्रम करून थांबतात. पुढे नोकरीतील संधीसाठी विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रम पूर्ण करायचा असतो, पण वेळेअभावी पूर्णवेळ महाविद्यालयात उपस्थित राहता येत नसल्याने अनेक जण पदवी आणि मास्टर्स पूर्ण करण्यास अपयशी ठरतात. अशा विद्यार्थ्यांसाठी पार्टटाईम इंजिनीअरिंग अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी युवासेना सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात यांनी अधिसभेत केली होती, मात्र विद्यार्थी हिताच्या या प्रस्तावाचा कुलगुरूंना विसर पडला आहे का, असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला.
मुंबई विद्यापीठांतर्गत काही महाविद्यालयांत याआधी पार्टटाईम इंजिनीअरिंग अभ्यासक्रम सुरू होते, मात्र काहीही कारण नसताना हे अभ्यासक्रम सहा वर्षांपूर्वी बंद करण्यात आले. पार्टटाईम अभ्यासक्रम सुरू झाल्यास मुंबई महापालिकेसह राज्य सरकार व पेंद्र सरकारमधील अभियंत्यांना मोठय़ा प्रमाणावर फायदा होणार आहे. तसेच नवीन तंत्रज्ञान व अभ्यासक्रमही त्यांना शिकता येणार आहे.
विद्यापीठाच्या कल्याण उपपरिसर येथे स्कूल ऑफ इंजिनीअरिंग सुरू केले आहे, मात्र तेथे अभ्यासक्रम शिकविले जात नाहीत. कल्याणबरोबर विद्यापीठाच्या सर्व उपपरिसरांमध्ये तसेच संलग्नित महाविद्यालयांमध्ये लवकरात लवकर पार्टटाईम इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम सुरू करावा.
अॅड. वैभव थोरात, सिनेट सदस्य, युवासेना

























































