
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईसारख्या शहरात जर तुमची बॅग हरवली, तर ती सापडणं जवळपास अशक्य आहे. पण, एका व्यक्तीची मौल्यवान वस्तू आणि दीड लाख रुपयांनी भरलेली बॅग सापडली आणि ती त्याला चक्क परत मिळाली आहे. अशक्य कोटीतली वाटणारी ही घटना सत्यात उतरली ती बॅगेत बॉम्ब असल्याच्या संशयामुळे.
मुंबई विमानतळावर शनिवारी रात्री एक बेवारस बॅग सापडल्याने खळबळ उडाली होती. या बॅगमध्ये बॉम्ब असावा या संशयाने बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले. बॉम्बच्या संशयामुळे श्वानपथकही तिथे हजर झाले होते. बॅगेच्या आसपासचा परिसरही निर्मनुष्य करण्यात आला होता. बॉम्बशोधक पथकाने बॅगेत बॉम्ब नसल्याचं जाहीर केल्यानंतर ती बॅग उघडून त्याची तपासणी करण्यात आली. बॅग उघडल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्या बॅगमध्ये मौल्यवान वस्तू आणि दीड लाख रुपये आढळले.
या सगळ्या ऐवजासोबत त्या बॅगेत एका व्यक्तीचे आधारकार्डही सापडले. मोहन भोईर असं त्या व्यक्तीचं नाव होतं. भोईर यांच्याशी त्वरित संपर्क करून पोलिसांनी ओळख पटवून ती बॅग त्यांच्या हवाली केली. भोईर हे शनिवारी भूतानवरून मुंबई विमानतळावर आले होते. घाईघाईत ते त्यांची बॅग विमानतळावरच विसरले.




























































