बीएसएफचे १० जवान बेपत्ता, पळाले की अपहरण?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुघलसराई

पश्चिम बंगालहून लष्करासाठीच्या विशेष रेल्वेने जम्मू कश्मीरमधील सांबा जिल्ह्यासाठी रवाना झालेले सीमा सुरक्षा दलाचे १० जवान अचानक बेपत्ता झाले आहेत. या जवानांचे अपहरण झाले की ते पळून गेले याबाबत अद्याप काहीच समजलेले नाही. याप्रकरणी मुघलसराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या जवानांचा शोध घेण्यात येत आहे.

सीमा सुरक्षा दलाचे ८३ जवान पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथून सांबा जिल्ह्यासाठी लष्कराच्या विशेष रेल्वेने रवाना झाले होते. ही रेल्वे मुघलसराई स्थानकावर थांबलेली असताना दहा जवान बेपत्ता असल्याचे अधिकाऱ्यांना समजले. याप्रकरणी कमांडरने मुगलसराई रेल्वे स्थानकाच्या जीआरपीकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी जीआरपीने तपास सुरू केला आहे.

बेपत्ता जवान हे मुर्शिदाबाद स्थानकावरून ट्रेनमध्ये चढले होते. मात्र धनबाद स्थानक गेल्यानंतर कमांडरने जवानांची हजेरी घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी दहा जवान बेपत्ता असल्याचे समोर आले, अशी माहिती मुघलसराईचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कुमार यादव यांनी सांगितले.