कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या कंपन्यांमध्ये 4 दिवस काम 3 दिवस सुट्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटनच्या 100 कंपन्यांनी त्याच्या कर्मचाऱ्यांसाठी तीन दिवस सुट्टी आणि चार दिवस काम या नव्या धोरणाला मंजुरी दिली आहे. हे धोरण लागू करण्यात आले असले तरी कर्मचाऱ्यांचा पगार कमी करणार नसल्याचे या कंपन्यांनी म्हटले आहे. ब्रिटनमध्ये नवी कार्य संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न सुरु झाला असून या 100 कंपन्यांनी त्याचा श्रीगणेशा केला आहे. ब्रिटनच्या या 100 कंपन्यामध्ये 2600 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात.
या नवीन धोरणामुळे आता कर्मचाऱ्यांना आठवड्यात 2 ऐवजी 3 दिवस सुट्ट्या मिळणार आहेत. कंपनीच्या या नवीन धोरणामुळे उत्पादनात सुधारणा होईल, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.

द गार्डियन या वृत्तपत्राने दिलेल्या बातमी नुसार, चार दिवसांच्या कामकाजी आठवड्यामुळे कंपन्यांचे उत्पादन सुधारेल आणि काम कमी वेळात पूर्ण होईल असा दावा कंपन्यांनी केला आहे. हे नवीन धोरण स्वीकारणाऱ्या कंपन्यांकडे दुसऱ्या कंपन्यांच्या तुलनेत कर्मचारी जास्त आकर्षित होत आहे. या 100 कंपन्यांमध्ये ब्रिटनच्या अॅटम बॅंक आणि एविन या मार्केटिंग कंपनीचा समावेश आहे. या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या 450 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना चार दिवस काम करण्याची आणि तीन दिवस सुट्टीची मंजुरी दिली आहे.

द गार्डियनशी बोलतांना, एविन या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅडम रॉस यांनी सांगितले की, या नवीन धोरणाचा स्वीकार इतिहासात पहिल्यांदाच होत आहे. मागच्या दीड वर्षात कर्मचाऱ्यांचा कल्याणकारी योजनेतही वाढ होतांना दिसत आहे. यामुळे आमच्या ग्राहक सेवांमध्येही सुधारणा होत आहे.
ब्रिटनमध्ये 6 महिन्यांसाठी 4 दिवस कामकाजी आठवड्याचा पथदर्शी कार्यक्रम जून महिन्यांपासून सुरु करण्यात आला होता. त्यानुसार कर्मचाऱ्यांना चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्ट्या दिल्या जायच्या. ब्रिटनमधल्या 70 कंपन्यांनी ही पद्धत स्विकारली होती. चार दिवसांच्या कामकाजी आठवड्याची ही मोहीम ब्रिटनच्या काही समाजसेवी संस्था ‘फोर डे वीक ग्लोबल’ आणि ‘फोर डे वीक यूके’ कॅंपेनने सुरु केला होता. या मोहिमेचे परिणाम 2023 मध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे. ब्रिटनच्या अनेक कंपन्या या फोर डे वर्किंग लागू करण्याच्या तयारीत आहे.