
सामना प्रतिनिधी । हिमायतनगर
तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडुकांच्या पार्श्वभूमिवर हिमायतनगर तालुक्यातील पवना मध्य रस्त्याने जाणाऱ्या १५ क्विंटल गोमांस घेऊन जाणारी महींद्रा जीप येतील गो- रक्षकांच्या पुढाकारामुळे पकडण्यात आले असून, वाहन पकडताच आरोपींची घटनास्थळावरून पलायन केले. दरम्यान पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शन व पोलीस निरीक्षक रवींद्र बोरसे यांच्या सूचनेने पोलिसांनी फरार झालेल्या आरोपीना पाठलाग करून पकडले आहे. ही घटना दि.०६ रोजी दुपारी घडली असून, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शासनाने राज्यात गोहत्याबंदी घातल्यानंतरही गोमांसाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे उघड झाले आहे.
तेलंगणा राज्यात निवडणुकीचे वारे जोमाने वाहू लागले आहे, त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून तस्करी केल्या जाणाऱ्या गोमांसाचा ट्रॅक हीमायतनगर पोलिसांनी पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हीमायतनगर तालुक्यातील सरसम – पवना रस्ता मार्गाने महींद्रा जीप क्रमांक एमएच २६ एडी ३५२७ यांमधून २५ टन गोमांस नेले जात होते. दरम्यान पवना रस्त्यावर वाहनाचा पाट्या तुटल्याने गाडी थांबली, याचा ठिकाणी थोड्या अंतरावर विहींपचे जिल्हामंत्री किरण बिच्चेवार यांची गोशाळा आहे. ते नेहमीप्रमाणे गुरांना चारा- पाणी करण्यासाठी जातांना त्यांना ही गाडी दिसली. यामध्ये मोठ्या प्रमाणात साहीत्य वाहतूक करणारे कॅरेट भरून होते. यावर संशय आल्याने अगोदर त्यांनी चालकाची विचारपूस केली असता त्याने एका वर्तमानपत्राची वाहतूक करणारी ही गाडी असल्याचे सांगून दिशाभूल केली. दरम्यान बिच्चेवार विचारपूस करत धारेवर धरून जिल्हा पोलीस अधीक्षकांना संपर्क करताच चालक व अन्य एकाने वाहन सोडून धूम ठोकली.
तात्काळ पोलीस अधीक्षकांनी हिमायतनगर पोलिसांना माहीती देऊन पाठविले, तसेच फरार झालेल्या आरोपींना पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले. बाहेरून भाजीपाल्याचे कॅरेट दिसत असले तरी आतमध्ये प्लॅस्टीकच्या निळ्या रंगाच्या ड्रममध्ये गोमांस भरून तस्करी केली जात असल्याचे उघड झाले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा केला असून, यामध्ये तब्बल १५ क्विंटल गोमांस असल्याचे निष्पन्न झाले. हा मुद्देमाल हिमायतनगर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.




























































