150 कुटुंबांचा 20 वर्षांचा वनवास संपला; नवी मुंबईत धोकादायक इमारतींच्या जागेवर संक्रमण शिबीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नवी मुंबई

जुईनगरमधील धोकादायक श्रद्धा सोसायटीच्या जागेवरच संक्रमण शिबीर उभे राहणार असून या सोसायटीच्या पुनर्विकासाला गती मिळणार आहे. उपलब्ध जागेच्या एका बाजूला हे शिबीर उभारले जाईल. तसेच उर्वरित भूखंडावर नव्या इमारती उभ्या राहणार असून 150 कुटुंबांचा 20 वर्षांचा वनवास अखेर संपला आहे. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी सोसायटीच्याच जागेवर संक्रमण शिबीर उभारण्यास परवानगी दिल्याने रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दरम्यान पडीक जमिनीवर संक्रमण शिबीर उभारण्याचा प्रस्ताव पालिकेने फेटाळून लावला असून पुनर्विकासात खोडा घालणाऱ्या सत्ताधारी राष्ट्रवादीचे मनसुबेही उधळले गेले आहेत.

शिवसेनेचा पाठपुरावा
धोकायदाक सोसायटय़ांच्याच जागेवर संक्रमण शिबिराला परवानगी देण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, नगरसेवक किशोर पाटकर यांनी जोरदार पाठपुरावा केला. त्याची जोरदार दखल घेऊन महापालिका प्रशासनाने वाशी येथील सेक्टर 10 मधील श्रद्धा सोसायटीच्या मोकळ्या भूखंडावर 350 आणि सेक्टर 9 मधील अवनी सोसायटीच्या जागेवर 150 घरांच्या संक्रमण शिबिराला परवानगी दिली आहे.

वाशी येथील सेक्टर 10 मधील श्रद्धा सोसायटी धोकादायक बनल्यानंतर येथील 150 कुटुंबांना जुईनगर येथील संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. या संक्रमण शिबिराची स्थितीही दयनिय असल्याने या कुटुंबांची अवस्था आगीतून निघून फुपाटय़ात पडल्यासारखी झाली. गेल्या 15 वर्षांपासून फक्त पुनर्विकास आणि एफएसआयच्या घोषणा झाल्या. त्यामुळे हे कुटुंब गेल्या 20 वर्षांपासून तिथेच जुईनगरमध्ये अडकून पडली आहेत. पुनर्विकासाला गती देण्यासाठी महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी शहरातील उद्यानाच्या पडीक जांगावर संक्रमण शिबिरे उभारण्याचा प्रस्ताव आणला. मात्र युती सरकारला याचे श्रेय जाऊ नये म्हणून सत्ताधारी राष्ट्रवादीने तो नामंजूर केला.

अडीच एफएसआय
नवी मुंबईमध्ये सुमारे 55 हजार कुटुंब धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करीत आहेत. युती सरकारने सत्तेवर आल्यानंतर तीन महिन्यांत शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी अडीचचा एफएसआय मंजूर केला. मात्र राष्ट्रवादीच्या खोडसाळ राजकारणामुळे अद्यापपर्यंत एकाही प्रकल्पाची वीट रचली गेली नाही. मात्र आता धोकादायक इमारतींच्या जागांवर संक्रमण शिबिरे उभारण्याची परवानगी महापालिकेने दिल्यामुळे पुनर्विकासाच्या कामाला गती येणार आहे.