
आर्थिकदृष्टय़ा डबघाईला आलेली सर्वसामान्यांची एसटी वर्षभरापासून सवलतीवर स्वार झाली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या ज्येष्ठांसाठीच्या ‘अमृत ज्येष्ठ नागरिक व महिला सन्मान योजने’मुळे एसटीला उभारी मिळाली असून गेल्या वर्षभरात तब्बल 63 कोटी प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेत एसटीने प्रवास केला आहे. त्यामुळे महामंडळाला तब्बल 2212 कोटी रुपये एवढा विक्रमी महसूल सवलतीच्या माध्यमातून मिळाल्याने एसटी आर्थिकदृष्टय़ा सक्षम होऊ लागली आहे.
राज्य सरकारने एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ‘अमृत ज्येष्ठ नागरिक व महिला सन्मान’ योजना जाहीर केली आहे. त्यानुसार ज्येष्ठांना एसटीने मोफत प्रवास करता येत असून महिलांना अर्ध्या तिकिटावर प्रवास उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ऑगस्ट 2022 पासून 21 कोटी 26 लाख ज्येष्ठांनी एसटीने मोफत प्रवास केला आहे, तर महिलांनी मार्चपासून 42 कोटी 25 लाख महिलांनी अर्ध्या तिकिटावर प्रवास केला आहे. सरकारने जाहीर केलेल्या सवलतीनुसार महामंडळाला तब्बल 2212 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.




























































