मी महिन्याला 40 हजार सहज कमवू शकतो…, डिलिव्हरी बॉयचं काम करण्यासाठी सोडली मोठ्या कंपनीतली नोकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेन्नईमधील ‘सीको वेल्थ’ (Seeco Wealth) या कंपनीच्या संस्थापकाने शेअर केलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. कंपनीचे संस्थापक अक्षत जैन यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीतील एका अत्यंत हुशार 22 वर्षीय तरुण कर्मचाऱ्याने अचानक नोकरी सोडली. त्याच्या कौशल्यावरून भविष्यात प्रगतीची मोठी संधी मिळाली असती. असे असतानाही केवळ डिलिव्हरी बॉय म्हणून काम करण्यासाठी या तरुणाने ऑफिसला रामराम ठोकला आहे.

या तरुणाने राजीनामा देण्यामागचे मुख्य कारण म्हणजे ‘पैसा’ (Money). तरूणाने आपल्या सरांना सांगितले की, डिलिव्हरीचे काम करून तो दरमहा 35 ते 40 हजार रुपये सहज कमवू शकतो. या तरुणाने सुरुवातीला शनिवार-रविवार फावल्या वेळेत डिलिव्हरीचे काम करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी ऑफिसच्या पगारापेक्षा डिलिव्हरीच्या कामात जास्त आर्थिक फायदा होत असल्याचा अनुभव त्याला आला आणि म्हणूच आपली नोकरी सोडून त्याने पूर्णवेळ हेच काम करण्याचा निर्णय घेतला.

अक्षत जैन यांच्या मते, या तरूणाकडे कामाची जिद्द होती. त्यांच्या कामावरील प्रामाणिकता आणि कौशल्यामुळे कंपनी त्याला भविष्यातील ‘टीम लीडर’ म्हणून तयार करत होती. कंपनीतर्फे त्याला नवनवीन पुस्तके दिली जात होती आणि ‘एआय’ (AI) सारखे आधुनिक तंत्रज्ञानही शिकवले जात होते. पुढील 3- 5 वर्षांत तो एका मोठ्या पदावर पोहोचू शकला असता, मात्र या तरुणाने अल्पकालीन आर्थिक फायद्याला जास्त महत्त्व दिल्याने जैन यांनी खंत व्यक्त केली.

तरूणाने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा जैन यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. डिलिव्हरीच्या कामात भविष्यात कोणतीही वाढ (Growth) नाही. आज तुझे शरीर तुला साथ देत आहे, त्यामुळे तू हे काम करू शकतोस. पण पुढच्या 5 वर्षांनंतर तब्येतीचे प्रश्न निर्माण होतील. आणि तेव्हा तुझ्याकडे कॉर्पोरेट कौशल्येही नसतील, असे जैन यांनी सांगितले. मात्र, भविष्यातील प्रगतीपेक्षा आता हाताशी येणारा जास्त पैसा त्या तरुणाला अधिक महत्त्वाचा वाटला आणि त्याने जैन यांचा सल्ला मानण्यास नकार दिला.

सोशल मीडियावर ही बातमी समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे. काहींनी त्या तरुणाला ‘अविचारी’ म्हटले आहे, तर अनेकांनी संस्थापक अक्षत जैन यांच्यावरच टीका केली आहे. जर एखादा कर्मचारी 40 हजारांसाठी तुमची कंपनी सोडत असेल, तर तुम्ही त्याला नक्की किती पगार देत होतात?” असा खोचक सवाल युजर्सनी विचारला आहे. केवळ पुस्तके आणि ट्रेनिंग देऊन पोट भरत नाही, तर तेवढा पगार देणेही कंपनीचे कर्तव्य आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.