वेब न्यूज – कॅस्पियन सीलच्या मृत्यूचे रहस्य

रशियाच्या कॅस्पियन समुद्रकिनाऱ्यावर अत्यंत दुर्मीळ अशा प्रजातीचे 2500 सील मृतावस्थेत वाहून आले आहेत. 2008 सालापासून कॅस्पियन समुद्रात आढळणारी एकमेव प्राणी प्रजाती म्हणून इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर  (IUCN) ने या सीलचा लुप्त होत असलेल्या दुर्मीळ प्रजातीमध्ये समावेश केलेला आहे. रेड लिस्टमध्ये समाविष्ट असलेला हा सस्तन प्राणी केवळ कॅस्पियन समुद्रात आढळतो. रशिया, इराण, अझरबैजान, कझाकस्तान आणि तुर्कमेनिस्तान हे पाच देश कॅस्पियन समुद्राला लागून आहेत. कॅस्पियन समुद्र हा जगातील सर्वात मोठा आंतरदेशीय जलसाठा आहे. हे मृत सील यापैकी रशियाच्या रिपब्लिक ऑफ दागेस्तानमध्ये कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर वाहून आले आहेत. या प्राण्यांच्या मृत्यूचे नक्की कारण अजून समोर आलेले नसले तरी हवामान बदलाचा हा परिणाम असावा असे शास्त्र्ाज्ञांचे मत आहे. या मृत सीलच्या अंगावर कुठल्याही प्रकारच्या जखमा आढळून आलेल्या नाहीत किंवा मासेमारीच्या जाळय़ांचेदेखील काही अवशेष सापडले नाहीत.

साधारण दोन आठवडय़ांपूर्वी या सीलचा मृत्यू झालेला आहे. नैसर्गिक कारणाने हे मृत्यू झालेले असून येत्या काळात ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कॅस्पियन पर्यावरण केंद्राचे संशोधक सध्या या मृत सीलचे नमुने तपासत आहेत आणि त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. रशियाच्या नैसर्गिक संसाधने आणि पर्यावरण मंत्रालयाच्या सांगण्यानुसार याआधी समुद्राच्या किनाऱ्यावर 700 मृत सील आढळून आले होते, मात्र अल्पावधीत ही संख्या सुमारे 2500 पर्यंत वाढली आहे. रशियन मीडिया रिपोर्टस्नुसार, अधिकारी समुद्रकिनाऱ्यांवर इतरही सील आढळतात का याचा तपास करत आहेत. दागिस्तान मंत्रालयाने ही घटना गंभीर असल्याचे मान्य केले आहे, मात्र त्याचबरोबर या प्रदेशात कॅस्पियन सीलची संख्या अजूनही आश्वासक आणि स्थिर असल्याचे नमूद केले आहे.