अमरावतीत कोरोनाचा प्रकोप; 24 तासांमध्ये 320 नवे रूग्ण आढळले, 5 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत आतापर्यंत 320 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 24 तासात एवढ्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच रुग्ण आढळले आहेत. ही आतापर्यंतच्या रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. तसेच रविवारी दुपारी आलेल्या अहवालात 156 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 8468 झाली आहे. शहरी आणि ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव वाढत आहे. गेल्या 24 तासात ग्रामीण भागात 90 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. तसेच गेल्या 24 तासात 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये पथ्रोट येथील 68 वर्षीय पुरूष, साईनगर येथील 85 वर्षीय पुरूष, माहुली जहागिर येथील 60 वर्षीय पुरूष, चांदूर रेल्वे येथील 48 वर्षीय महिला व नांदगाव खंडेश्वर येथील 70 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 196 वर पोहचली आहे. शनिवारी आलेल्या अहवालाच्या पहिल्या टप्प्यात 104 रूग्ण आढळून आल्यानंतर रात्री 9 वाजता आलेल्या अहवालात 216 रुग्ण आढळून आले. दुसर्‍या अहवालात ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. रात्री आलेल्या अहवालात 90 पेक्षा जास्त रुग्ण ग्रामीण भागातील आहे. यात सर्वाधिक रुग्ण वरूड तालुक्यात 24 तर दर्यापूर येथे 23 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासोबत चांदूर रेल्वे येथील 13, मोर्शी येथील 12, भातकुली येथील 13, अंजनगाव सुर्जी येथील 4, अमरावती तालुक्यात सावर्डी येथे 5 तर तिवसा तालुक्यातील मोझरी येथे 2 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. उर्वरित रूग्ण अमरावती शहराच्या आजूबाजूच्या खेड्यातील तसेच शहराच्या वेगवेगळया भागात आढळून आले. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 8468 वर गेली आहे. त्यापैकी 1882 रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 6 हजार 334 आहे.