कोपरगाव कारागृहातील गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्या 35 कैद्यांची हरसुल कारागृहात रवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगांव येथील दुय्यम कारागृहातील गंभीर गुन्ह्यातील 35 आरोपींना मध्यवर्ती कारागृहात हरसुल औरंगाबाद येथे मोठ्या पोलीस बंदोबस्तात आज पाठविण्यात आले. शिर्डी येथील सूरज ठाकरे यांच्यावर केलेल्या गोळीबारातील आरोपी किरण हजारे, रविंद्र गोंदकर, तनवीर रंगरेज, आकाश लोखंडे आदि आरोपींचा समावेश आहे तसेच शिर्डीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिंगटोन प्रकरणांमधील सागर शेजवळ खून प्रकरणांतील सोमनाथ वाडेकर, रामा जाधव, दीपक मांजरे, शोयब शेख, किरण आजबे, विशाल कोते आदि आरोपींचा समावेश आहे.

लोणी पोलीस स्टेशनचा खतरनाक आरोपी शाहरुख सत्तार खान तसेच उर्वरित सर्व भादविक 302, 307, 395, 376 या कलमातील एकूण सहा पोलीस स्टेशनच्या कोपरगाव शहर पोलीस स्टेशन, कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन, शिर्डी पोलीस स्टेशन, राहाता पोलीस स्टेशन, लोणी पोलीस स्टेशन आणि श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यांतील आरोपींचा समावेश आहे. कारागृहाचे तुरुंगाधिकारी चंद्रशेखर कुलथे यांनी सदरचा प्रस्ताव दि. 7 जानेवारी 2023 रोजी कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग येरवडा, पुणे यांना पाठविला होता. सदरील प्रस्तावामध्ये कोपरगांव दुय्यम कारागृहात एकूण 5 कोठड्या असून, त्यामध्ये आरोपी ठेवण्याची क्षमता केवळ 25 अशी आहे; परंतु सध्या 90पेक्षा जास्त आरोपी संख्या झाल्याने तसेच सदरचे कारागृह हे अत्यंत जुने झालेले असल्याने गंभीर गुन्हयांतील आरोपींना वर्ग करण्यास परवानगीची मागणी केलेली होती. त्यांना कारागृह उपमहानिरीक्षक येरवडा, पुणे यांनी दि. 24 जानेवारी रोजी 35 आरोपींना वर्ग करण्याचा आदेश तरुंगाधिकारी दुय्यम कारागृह यांना दिला.

त्यानंतर कारागृह प्रशासनाने 35 गंभीर गुन्हयांतील आरोपींना घेऊन जाण्यासाठी स्ट्रॉंग पोलीस बंदोबस्त व मोठ्या वाहनांची मागणी पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी यांच्याकडे दि. 24 जानेवारी रोजीच नोंदविली, मात्र नाशिक पदवीधर निवडणूक असल्याने पोलीस बंदोबस्त दि. गुरुवारी 2 फेब्रुवारी रोजी प्राप्त झालेल्या 35 आरोपींना सुरक्षिततेच्या कारणास्तव मोठ्या पोलीस बंदोबस्तात पाठविण्यात आले. यावेळी कोपरगांव शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भरत दाते व रोहिदास ठोंबरे तसेच एकूण सहा पोलीस ठाण्याचे 24 पोलीस अंमलदार व वरिष्ठ दर्जाचे दोन उपनिरीक्षक, असा मोठा फौजफाटा संजय सातव एस.डी.पी.ओ. शिर्डी भाग यांनी कारागृह प्रशासनास पुरविला.

यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक, डॉ. कृष्णा फुलसौंदर व वैद्यकीय पथक यांनी आरोपींची वैद्यकीय तपासणी केली. याबाबत कारागृह प्रशासनाने तहसिलदार विजय बोरुडे व तुरुंगाधिकारी चंद्रशेखर कुलथे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला अहमदनगर, शिर्डी विभागाचे संजय सातव कोपरगांव पोलीस स्टेशन व इतर सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांचे आभार मानले.