
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई विद्यापीठाच्या वतीने गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये तब्बल 35 हजार विद्यार्थी नापास झाल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी 97 हजार विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले होते. त्यापैकी 35 हजार विद्यार्थ्यांच्या पुनर्मूल्यांकन निकालात त्यांना चुकून नापास करण्यात आल्याचे तसेच केवळ ग्रेस मार्क मिळाल्याने हे विद्यार्थी पास झाल्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एका तारांकित प्रश्नाला लेखी उत्तर देताना सांगितले. यावरून पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आल्याचेच उघड झाले आहे.
याबाबत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विलास पोतनीस यांच्यासह अन्य सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या 97 हजार विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये थोडय़ाफार प्रमाणात वाढ झाली. पुनर्मूल्यांकनामध्ये त्यापैकी सुमारे 35 हजार विद्यार्थी पास झाल्याचे तावडे यांनी सांगितले. दरम्यान, एप्रिल-मे 2017 मधील परीक्षांचे काही विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल तांत्रिक अडचणीमुळे उशिरा जाहीर झाल्याचे त्यांनी मान्य केले.
राज्यात हजारो विद्यार्थी अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या प्रतीक्षेत
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या चार सर्वसाधारण आणि एक विशेष फेरी होऊनही हजारो विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. ज्यांचे प्रवेश उशिरा झाले त्यांच्या अतिरिक्त तासिका घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या सूचना केल्याचे तावडेंनी सांगितले. याबाबत गाणार, सोले, व्यास, आंबटकर आणि गिरकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.






























































