
नशेबाजांना विक्री करण्यासाठी आणलेला कोडेन फॉस्फेट मिश्रित कफ सिरफच्या बाटल्यांचा साठा अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटने जप्त केला. जवळपास चार हजार 947 बाटल्यांचा तो साठा असून त्याची किंमत 22 लाख 36 हजार इतकी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
माझगावच्या नारळवाडी परिसरात काही इसम पाच हजार कोडेन फॉस्फेट मिश्रित कफ सिरफ बाटल्यांची बेकायदेशीपणे डिलिव्हरी देण्यासाठी येणार असल्याची खबर आझाद मैदान युनिटला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे धडक दिली असता तेथे दोन व्यक्ती एका टेम्पोजवळ बेकायदेशीरपणे खाकी बॉक्सची देवाण-घेवाण करीत असताना सापडल्या. त्यामुळे टेम्पो चालकासह दोघा व्यक्तींना ताब्यात घेऊन टेम्पोची तपासणी केली असता त्यात 100 मिली वजनाच्या तीन हजार 820 कोडेन फॉस्फेट मिश्रीत कफ सिरफ बाटल्यांचा साठा सापडला.
हा साठा जप्त करून आरोपींकडे चौकशी केल्यावर त्यांनी काही वेळापूर्वी अॅण्टॉप हिलला काही बाटल्यांचा साठा विकल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलीस पथकाने अॅण्टॉप हिल गाठून 100 मिली वजनाच्या तब्बल एक हजार 130 पाच हजार कोडेन फॉस्फेट मिश्रित कफ सिरफ बाटल्यांचा साठा जप्त केला.
























































