
प्लॉटिंग व्यावसायिकाकडे तब्बल 50 लाख रूपये खंडणी मागितल्याची घटना 10 जानेवारीला घडली आहे. आरोपीने व्यावसायिकाला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी खंडणीची मागणी करत तडजोडीअंती 4 लाख रूपयांची मागणी केली. याप्रकरणी संबंधिताविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनु आण्णा सोनवणे (रा. लक्ष्मी कॉलनी, जुना कॅनॉल जवळ, हडपसर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रमेश नंदकुमार दंडाले (40, रा. शेवाळेवाडी, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रमेश दंडाले यांचा प्लॉटींगचा व्यवसाय असून आरोपी सोनू सोनवणे याने त्यांच्याविरूध्द तहसिलदारांकडे तक्रारी अर्ज केला होता. त्याशिवाय रमेश यांच्याविरूद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा, असा अर्ज आकुर्डी पोलीस ठाण्यात केला होता. त्यावेळी रमेश हे संबंधित पोलीस ठाण्यातून बाहेर येत असताना आरोपी सोनवणेने त्यांना अडविले. प्रकरण मिटवायचे असेल तर 50 लाख रूपये मागितले. तडजोडीअंती त्याने 4 लाखांची खंडणी मागितल्याचे दंडाले यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
पोलीस घेणार शोध
तक्रारदार रमेश यांनी एक प्लॉट नवनाथ कादमाने यांना विक्री केला होता. त्यात अनधिकृतपणे पाच मजली इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचा संशयातून ते पीएमआरडीए कार्यालयात तक्रार देण्यासाठी गेले होते. त्यापुर्वी आरोपी सोनु सोनवणे याने तक्रार दिल्याचे समजले. तेथेही आरोपी सोनवणे कशासाठी गेला होता, याचा पोलीस शोध घेत आहे.





























































