585 गिरणी कामगारांना मिळाले हक्काचे घर

म्हाडातर्फे गिरणी कामगारांसाठी पनवेलच्या मौजे कोन येथील 2417 सदनिकांच्या विक्रीकरिता 2016 मध्ये सोडत काढण्यात आली होती. या सोडतीतील 585 विजेत्या गिरणी कामगार आणि वारसांना गुरुवारी घरांच्या चाव्या देण्यात आल्या. वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर हॉल येथे चावी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. घरासाठीची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपल्याने गिरणी कामगारांना आनंदाश्रू अनावर झाले.

मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे गिरणी कामगारांकरिता मौजे कोन येथील 2417 सदनिकांची संगणकीय सोडत 2 डिसेंबर 2016 रोजी काढण्यात आली होती. एमएमआरडीएतर्फे बांधलेल्या प्रत्येकी 160 चौरस फुटाच्या दोन सदनिका एकत्र करून 320 चौरस फूट चटई क्षेत्रफळ आकारमानाची सदनिका गिरणी कामगारांना मिळणार आहे.

– कोरोना काळात या सदनिका संबंधित पालिकेने ताब्यात घेऊन प्रशासकीय कारणास्तव त्याचा वापर केल्यामुळे या सदनिकांची दुरवस्था झाली होती. त्यामुळे या सदनिकांच्या दुरुस्तीचे म्हाडा मुंबई मंडळाने पुढाकार घेऊन सुरू केलेले काम पूर्ण झाले आहे.

घरांच्या पात्रता निश्चितीसाठी 15 मार्चपर्यंत मुदतवाढ
गिरणी कामगारांसाठी दिलासादायक बातमी आहे. घरांसाठी गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ‘म्हाडा’तर्फे गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कालबद्ध विशेष अभियानाला आता 15 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकडून ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने एकूण 1,08,492 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 89,648 अर्जदार पात्र ठरले असून उर्वरित अर्जांची छाननी करून पात्र-अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे.