
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना संशोधन आणि विकास अंतर्गत बीड आणि शिरूर तालुक्यासाठी 31 रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर सोमवारी 70 कोटी रूपयांच्या कामाचे आदेश निघाले आहेत. या निधीमुळे दोन्ही तालुक्यातील रस्ते आता चकाचक होणार आहेत. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
राज्य शासनाकडून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरू करण्यात आली. या योजनेतून नवीन रस्ते जोडण्यासाठी, अस्तित्वातील दुरावस्था झालेल्या, इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गाच्या दर्जोन्नतीसाठी महाराष्ट्र राज्याला वाढीव उद्दिष्टे देण्यात आली होती. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी 2019 मध्ये शिरूर आणि बीड तालुक्यातील प्रमुख गरजेचे 31 रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून प्रस्तावित केले होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे निधी उपलब्ध नसल्याने हे रस्ते रद्द करण्याच्या मार्गावर होते. पण या रस्त्यांची गरज लक्षात घेत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांना वारंवार विनंती केली. त्यामुळे या रस्त्यांच्या कार्यारंभाचे आदेश आता निघाले आहेत. बीड आणि शिरूर तालुक्यातील 31 रस्त्याच्या कामासाठी 70 कोटी रूपये निधी प्राप्त झाला आहे. यातील काही रस्त्यांच्या कामाला सुरूवातही करण्यात आली आहे.





























































