केजरीवालांच्या समर्थनार्थ चार मुख्यमंत्री धावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात गेल्या सहा दिवसांपासून ठिय्या आंदोलन करणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी इतर राज्यांतील मुख्यमंत्रीही उभे राहिले आहेत. पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केजरीवाल यांना पाठिंबा जाहीर केला. दिल्लीमधील पेच सोडवण्यासाठी केंद्राने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे या चारही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उपराज्यपाल बैजल यांना पत्र लिहून वेळ मागितली होती, परंतु त्यांनी काहीच उत्तर दिले नाही हे दुर्दैवी आहे असे आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू पत्रकार परिषदेत म्हणाले. एक मुख्यमंत्री गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन करतोय तरी उपराज्यपाल त्याला वेळ देत नसतील तर देशाचे भवितव्य काय असेल याचा अंदाज घेता येईल असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. दिल्लीची समस्या दूर करण्यासाठी केंद्राने तातडीने पावले उचलायला हवीत अशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केली तर केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन म्हणाले की, राज्य सरकारवर निर्बंध घालणे म्हणजे केवळ दिल्लीसाठीच नव्हे तर देशासाठी धोक्याचे आहे.