
सामना ऑनलाईन, मुंबई
मराठी माणूस, गणपती उत्सव आणि गिरगाव … अगदी पक्कं समीकरण. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली ती गिरगावच्या केशवजी नाईकांच्या चाळींतूनच. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी परंपरेच्या या गावात आज वेगळेच विघ्न उभे ठाकले आहे. मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाने गिरगावातील ज्या चाळी, इमारती गिळकृंत केल्या आहेत, तिथल्या रहिवाशांना यंदा बाप्पा कसा बसवायचा, याचीच चिंता लागली आहे. मंडळांचे कार्यकर्ते विखुरले आणि मंडळे विस्थापित झाली आहेत. गणपती गेले परगावाला, चैन पडेना गिरगावला, असेच काहीसे चित्र आहे.
एमएमआरसीएच्या मेट्रो प्रकल्पात गिरगावातील सूर्यमहल, चंद्रमहल, तारामहल, विठ्ठलदास भुवन अशा काही चाळी आणि इमारती जाणार आहेत. त्यातील काही कुटुंबांचे स्थलांतर पिंपळवाडीतील श्रीपती टॉवर्समध्ये करण्यात आले आहे, तर काही कुटुंबांनी भाडय़ाची रक्कम घेऊन गिरगावबाहेर स्थलांतर केले आहे. या कुटुंबांना आता नव्या जागेत घरचा गणपती बसवावा लागेल. प्रकल्पबाधित इमारतींतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसमोर तर मोठे प्रश्न उभे राहिले आहेत. उत्सव साजरा करायला जागा नाही की कार्यकर्ते नाही. त्यामुळे त्यांना जल्लोषात उत्सव साजरा करता येणार नाही. ‘सूर्यमहल’ सारख्या मोठय़ा गणपती मंडळाने यंदा उत्सव दीड दिवसावर आणलाय, तर ‘चंद्रमहल’च्या दीड दिवसाच्या उत्सवात कार्यकर्त्यांची उणीव जाणवणार आहे. ‘चंद्रमहल’ या इमारतीतील निम्मी कुटुंबे अन्यत्र रहावयास गेलेली आहेत.
घरचा गणपती गावाला – श्वेता विचारे
ठाकुरद्वारच्या विठ्ठलदास इमारतीत राहणाऱया श्वेता विचारे यांनी यंदाच्या गणेशोत्सवातील अडचणी दैनिक सामनाला सांगितल्या. विचारे कुटुंब सध्या पिंपळवाडीतील श्रीपती टॉवर्समध्ये राहत आहे. तिथे नवीन शेजारी आहेत. विठ्ठलदास इमारतीत जी मजा यायची ती आता इथे येणार नाही. त्यामुळेच विचारे कुटुंबाने यंदा आपला गणपती गावाला, रत्नागिरीला बसवायचे ठरवले आहे, अशी माहिती श्वेता विचारे यांनी दिली.
- मेट्रोने गिळलेल्या चाळींमधील अनेक घरांना टाळे लागले आहे.
- घरगुती, सार्वजनिक गणपती बसवायचे कुठे, रहिवाशांचा सवाल
- विठ्ठलदास इमारतीत शुकशुकाट
मेट्रोच्या प्रकल्पात ठाकुरद्वार येथील राममंदिरासमोरील विठ्ठलदास ही इमारत गेली आहे. तेथील ४० ते ४५ कुटुंबं स्थलांतरित झाले आहेत. काही कुटुंबं पिंपळवाडीतील श्रीपती टॉवर्समध्ये गेली आहेत. आतापर्यंत विठ्ठलदास इमारतीत सात दिवसांचा सार्वजनिक गणपती उत्सव साजरा केला जायचा. मात्र यंदा तिथे गणपती बसणार नाही.
सूर्यमहलचा गणपती फक्त दीड दिवस
ठाकूरद्वार नाक्याजवळील सूर्यमहल या इमारतीत यंदा दहा दिवसांऐवजी दीड दिवसाचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार आहे. यंदा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. मंडळाचे यंदा ५३वे वर्ष आहे. दरवर्षी सहा फुटांची गणेशमूर्ती सूर्यमहलच्या आवारातच तयार केली जाते. मात्र यंदा लहान मूर्ती प्रतिष्ठापित केली जाणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुहास मांजरेकर आणि नीलेश माजगांवकर यांनी दिली.






























































