
सामना प्रतिनिधी, मुंबई
इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक 2020पर्यंत पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचा 20 वा वर्धापन दिन परळमध्ये आयोजित करण्यात आला होता.
यावेळी शिवसेना खासदार राहुल शेवाळे, आमदार अजय चौधरी, राज पुरोहित, कालिदास कोळंबकर, भाई गिरकर, समन्वय समितीचे नागसेन कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, 6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱया आंबेडकर अनुयायांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच 2020 नंतर आंबेडकर अनुयायांना रांगेत उभे राहावे लागू नये यासाठी इंदू मिल येथील स्मारकात सर्व सोयीसुविधा कायमस्वरूपी निर्माण करण्यात येतील.


























































