
सामना ऑनलाईन, बेळगाव
कृष्णमूर्ती सिद्धार्थने झळकावलेल्या नाबाद 104 धावांच्या खेळीच्या जोरावर कर्नाटक क्रिकेट संघाने मंगळवारपासून येथे सुरू झालेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील ‘अ’ गटाच्या लढतीत पहिल्या दिवसअखेरीस 4 बाद 263 धावा तडकावल्या. मुंबईकडून शिवम दुबे याने 32 धावा देत चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
कर्नाटकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. देगा निश्चल (27 धावा) व शिशीर भावणे (5 धावा) यांना अपयशाला सामोरे जावे लागले. पण कौनेन अब्बास (64 धावा) व कृष्णमूर्ती सिद्धार्थ याने 104 धावांची भागीदारी करीत डाव सावरला. कौनेन अब्बास बाद झाल्यानंतर अनुभवी स्टुअर्ट बिन्नीला (3 धावा) मोठी खेळी करता आली नाही. आता कृष्णमूर्ती सिद्धार्थ याच्यासोबत श्रेयस गोपाल (नाबाद 47 धावा) हा खेळपट्टीवर खेळत आहे. मुंबईच्या संघात अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर या स्टार खेळाडूंची अनुपस्थिती असून धवल कुलकर्णी याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.



























































