
सामना ऑनलाईन । कराची/पेशावर
काही तासांच्या अंतराने झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यांनी पाकिस्तान हादरले आहे. कराचीमध्ये चिनी दूतावासावर दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट करीत गोळीबार केला. त्यात सातजण ठार झाले. त्यानंतर खैबर पख्तुनख्वा प्रांतात झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 30 ठार झाले तर 40 जण जखमी झाले आहेत.
कराचीतील क्फिटन रोड परिसरातील चीनच्या दूतावासात घुसण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला. बेछूट गोळीबार करीत ग्रेनेडहल्ला चढविला. त्यात दोन पोलीस, दोन नागरिकांचा मृत्यू झाला. सुरक्षारक्षकांनी गोळीबार करून तीन हल्लेखोरांना ठार केले. या हल्ल्याची जबाबदारी बलूच लिबरेशन आर्मी या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. चिनी नागरिक आणि दूतावासाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
मृतांमध्ये तीन शीख
मृतांमध्ये शीख समाजाच्या तीन नागरिकांचा समावेश आहे. पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदूंप्रमाणेच शिखांवरही दहशतवाद्यांनी यापूर्वीही अनेकदा हल्ले केले आहेत.
शिया मुस्लिम टार्गेट
खैबर पख्तुनख्वा प्रांतात पुन्हा शिया मुस्लिमांना टार्गेट करण्यात आले आहे. ओरकझाई जिल्हय़ात शुक्रवारच्या नमाजापूर्वी मोठा बाजार भरतो. जुम्मा बाजार म्हणून ओळखला जातो. शिया मुस्लिमांची संख्या येथे जास्त आहे. एका बाईकला शक्तिशाली स्फोटके लावून दहशतवाद्यांनी धमाका केला. त्यात किमान 30 जण ठार आणि 40 जण जखमी झाले आहेत. खैबर प्रांत हा अफगाणिस्तान सीमेजवळ असून दहशतवाद्यांनी अनेकदा शियांना टार्गेट केले आहे.
चिनी उद्योजकांना घाबरवण्यासाठी हल्ला – इम्रान खान
काही दिवसांपूर्वी आपल्या चीन दौऱयात झालेल्या औद्योगिक कराराला विरोध करण्यासाठी दूतावासावर हल्ला झाला. चीनच्या उद्योजकांना घाबरवण्यासाठी दहशतवाद्यांनी हल्ला केला असे पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.





























































