‘प्रायोगिक’ थिएटरच्या आश्वासनाचं काय? प्रेमानंद गज्वी यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

प्रायोगिक रंगभूमीचे प्रश्न जैसे थे आहेत. प्रायोगिक नाटकांसाठी थिएटर बांधू असे वर्षानुवर्षे सांगितले जात आहे. हे काम नाट्य परिषद आणि शासनाच्या अंतर्गत येतं, मग आतापर्यंत का झालं नाही? नुसती आश्वासने मिळाली, कृती काहीच झाली नाही अशी खंत 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केली. तसेच नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद म्हणजे या दृष्टीने मिळालेली संधी आहे, असेही गज्वी म्हणाले.

नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी नाव घोषित झाल्यानंतर दैनिक ‘सामना’शी संवाद साधताना प्रेमानंद गज्वी म्हणाले, नाट्य परिषदेच्या माध्यमातून प्रायोगिक नाटकांसाठी थिएटर बांधले जाणार आहे असे सांगितले गेले होते. विजय तेंडुलकर, अॅलेक पदमसी यांच्यापासून अनेकांनी प्रयत्न केले. अनेक वर्षे उलटली, पण प्रत्यक्ष कृती झालेली नाही. सरकारने पैसे दिले तरच होऊ शकतं असे सांगण्यात येतं. यासंदर्भात पुन्हा संवाद साधण्याची गरज आहे. विचारविनिमय करून प्रयत्न करू.

प्रायोगिक नाटकांसाठी पु. ल. देशपांडे कला अकादमीतील थिएटर जरी उपलब्ध करून दिले तरी चालेल. यशवंत नाट्यमंदिरात सकाळी 11 वाजताची वेळ दररोज प्रायोगिक नाटकांसाठी राखून ठेवली पाहिजे. त्यासाठी कमी भाडे आकारावे. असे झाले तरी सातही दिवस प्रायोगिक नाटकांचे प्रयोग होतील. हेही नसे थोडके, असे पर्यायही गज्वी यांनी सुचवले. त्याचबरोबर प्रायोगिक रंगभूमीला पूर्णवेळ वाहिलेले कलावंत आज नाहीत याची खंतही त्यांनी व्यक्त केली. असे ‘इंटिमेट’ कलाकार आणि प्रेक्षक नाहीत म्हणून प्रायोगिक नाटकांच्या थिएटरचा प्रश्न सुटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नाटकाच्या माध्यमातून वैचारिक घुसळण व्हायला पाहिजे. कामगार, दलित, झाडीपट्टी, प्रायोगिक, संगीत, व्यावासायिक असे खूप वेगवेगळ्या कप्प्यातून रंगभूमीचं काम करतोय. याचा सामायिक धागा नाट्य परिषदेच्या माध्यमातून उभा करण्याच्या दृष्टीने काही करता आले तर अधिक चांगले असे गज्वी म्हणाले. महाराष्ट्राच्या रंगभूमीला मर्यादित स्वरूप आलंय. ती देशपातळीवर नेत विवेकवादी विचार घडवण्याच्या दृष्टीने सगळ्यांना सोबत घेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.