
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्यात होणाऱ्या 24 हजार ऑनलाइन शिक्षक भरतीमध्ये मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाचा लाभ मिळेल व ही भरती वेळेत पूर्ण होईल याची सरकार काळजी घेईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले.
शिक्षक भरतीच्या तारांकित प्रश्नावरील चर्चेत भाग घेताना आमदार ऍड. आशीष शेलार म्हणाले की, शिक्षक भरतीचा निर्णय पूर्वी झाला असला तरी मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय 29 नोव्हेंबर रोजी झाला आहे. आता हा कायदा लागू करूनच ही शिक्षक भरती करण्यात यावी आणि त्यामध्ये मराठा समाजाच्या 16 टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्यात अशी मागणी शेलार यांनी केली. त्यावर उत्तर देताना होऊ घातलेल्या 24 हजार ऑनलाइन शिक्षक भरतीमध्ये 16 टक्के मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळेल, अशी घोषणा तावडे यांनी केली.
बोगस पटसंख्या असलेल्या शाळांवर कारवाई
बोगस पटसंख्या असलेल्या शाळांवर येत्या दोन महिन्यांत फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी घोषणाही तावडे यांनी यावेळी केली. शाळांची पटपडताळणी मागील सरकारच्या काळात 2011 मध्ये केली होती. त्यामध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी पटपडताळणी असलेल्या शाळांची संख्या 1404 असल्याचे दिसून आले होते. त्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले होते, तर 20 टक्क्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची मान्यता रद्द करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले होते. मात्र आजतागायत त्यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही याकडे शेलार यांनी लक्ष वेधले. त्याला उत्तर देताना कोणत्या कलमानुसार कारवाई करायची याबाबत कायदेशीर सल्लागारांचे मत जाणून घेऊन येत्या दोन महिन्यांत अशा शाळांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे तावडे म्हणाले.




























































