
मधुकर ठाकूर । उरण
जेएनपीटीच्या अध्यक्षपदी संजय सेठी यांची पाच वर्षीसाठी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यांनी नियुक्तीनंतर गुरुवारी पदभार स्वीकारला असल्याची माहिती जेएनपीटीच्या अधिकूत सुत्रांनी दिली.मात्र जेएनपीटीच्या अध्यक्षपदी अमराठी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजीचा सूर आहे.
जेएनपीटीच्या अध्यक्षपदी दोन वर्षीपुर्वी अनिल डिग्गीकर या मराठी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. बऱ्याच वर्षीनंतर जेएनपीटीच्या अध्यक्षपदी अमराठी ऐवजी मराठी अधिकारी नियुक्त करण्यात आल्याने स्थानिक भुमीपुत्र असलेल्या प्रकल्पग्रस्तांमध्येही आनंदाचे वातावरण पसरले होते.
अनिल डिग्गीकरांनीही जेएनपीटीच्या अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेताच जेएनपीटी सबंधित स्थानिक भुमीपुत्रांच्या समस्यांचा निपटारा करण्यालाच अधिक प्राधान्य देत कामकाजाची सुरुवात केली होती. त्यामुळे डिग्गीकर हे येथील भुमीपुत्रांचे एक प्रकारे तारणहारच बनल्याची प्रतिमा तयार झाली होती. मात्र प्रकलग्रस्तांशी सलगी त्यांच्या विरुद्ध कुटनीती आखणारे अधिकारी, नौकानयन मंत्रालय आणि मंत्र्यांना खटकली आणि डिग्गीकरांना जेएनपीटीच्या अध्यक्षपदावरून तत्काळ उचल बांगडी करण्यात आली.
त्यानंतर जेएनपीटीच्या प्रभारी अध्यक्ष म्हणून नीरज बन्सल यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र नीरज बन्सल यांनी पदभार स्विकारल्यापासूनच सातत्याने स्थानिकांच्या विरोधातच भूमिका घेतली. यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये आजही बन्सल विरोधात प्रचंड अंसतोष व्यक्त केला जात आहे. या असंतोषाचे रुपांतर आता संघर्षात झाले आहे. प्रकल्पग्रस्तांना सातत्याने अपमानास्पद वागणूक देणाऱ्या बन्सल विरोधात तो वाढतच चालला आहे. त्यामुळे बन्सल विरोधात आता संघर्षाचा नारा देत बन्सल हटाव, जेएनपीटी बचाव, मागणीचा घोषा सर्वपक्षीयांनी लावला आहे.
सर्वपक्षीयांकडून जेएनपीटीच्या अध्यक्षपदी मराठी अधिकाऱ्याच्या नियुक्तीची मागणी असतानाच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कंपूने अमराठी असलेल्या संजय सेठी यांची नियुक्ती जाहीर केली आहे. सेठी हे प्रशासकीय सेवेतील १९९२ बँचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. जेएनपीटीच्या अध्यक्षपदी त्यांची पुढील पाच वर्षासाठी नियुक्ती जाहीर झाली आहे. त्यांनी नियुक्तीनंतर गुरुवारी पदभार स्वीकारला आहे. मात्र त्यांना प्रकल्पग्रस्तांच्या रोषालाच अधिक सामोरे लागणार असल्याचीच आजची स्थिती आहे.




























































