वाघाच्या नजरेला नजर भिडवत तिने केला मृत्यूचा सामना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

मध्यप्रदेशमधील सातपुडा पर्वत रांगांमधील होशंगाबाद व्याघ्रप्रकल्पात मंगळवारी एका महिला वनरक्षक कर्मचाऱ्याचा साक्षात मृत्यूशी सामना झाला. प्राण्यांची गणना करण्यासाठी गेलेल्या या महिलेसमोर अचानक वाघ आला. तिला बघताच वाघाने जोरदार डरकाळ्या फोडण्यास सुरुवात केली. पण महिलेने प्रसंगवधान ओळखत वाघाच्या नजरेला नजर भिडवली. तब्बल दीड तास ती एकाच जागी स्तब्ध उभी होती. अखेर वाघ शांतपणे तिथून निघून गेला. त्यानंतर महिलेसह इतर कर्मचाऱ्यांनी सुटेकचा निश्वास सोडला. सुधा दुर्वे असे तिचे नाव असून तिने दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मध्यप्रदेशमधील सातपुडा व्याघ्र प्रकल्पाच्या मटकुली भागात सुधा वनरक्षक म्हणून कार्यरत आहे. मंगळवारी सकाळी ती व तिचे दोन सहकारी प्राण्यांची गणना करण्यासाठी या भागात आले होते. त्यावेळी त्यांना मातीत प्राण्याच्या पावलांचे ठसे दिसले. सुधा व इतर दोघे त्या ठशांचा मागोवा घेत घेत एका नाल्याजवळ पोहोचले. त्यावेळी 8 ते 10 मीटर अंतरावर त्यांना वाघ बसलेला दिसला. वाघाला बघताच सुधा व इतरांची पुरती घाबरगुंडी उडाली. सुधा आणि तिच्या साथीदारांना बघितल्यानंतर वाघाने डरकाळ्या फोडायला सुरुवात केली. त्याच्या डरकाळ्यांनी सारे जंगल दणाणून गेले. पक्ष्यांची फडफड झाली आणि बघता बघता वाघाची पावले सुधाच्या दिशेने वळली. वाघ आता आपल्याला मारणार या भीतीने सुधाच्या सोबत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांची बोबडीच वळाली. हातपाय लटपटू लागले. पण सुधा मात्र स्तब्ध होती. वनरक्षक पदाच्या प्रशिक्षणावेळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना तिला आठवल्या आणि तिने जराही न डगमगता वाघाच्या नजरेला नजर भिडवली. वाघही तिच्याकडे नजर रोखून बघत होता. तिच्या प्रत्येक हालचाली तो निरखत होता. सुधावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या वाघाने नंतर पुन्हा डरकाळ्या फोडण्यास सुरूवात केली. पण सुधा सगळं बळ एकवटून त्याच्या डोळ्याला डोळा भिडवून त्याच्याकडेच बघत होती.

तिने कुठलीही हालचाल न करण्याच्या सूचना सहकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे तेही आहे त्याच अवस्थेत उभे होते. तब्बल दीड तास वाघ सुधावर नजर रोखून होता. अखेर वाघ मागे वळला व शांतपणे तिथून निघून गेला. त्यानंतर सुधा व इतर दोघांनी तिथून पळ काढला.