
कोरोना महामारीचा पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. पूर्णपणे कोलमडलेल्या या क्षेत्राने लाखो लोकांचा रोजगार गेलाय. यात जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचाही समावेश आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकल्प बंद असल्याने त्यावर आधारित व्यवसाय आणि रोजगार देशोधडीस लागलाय. पण अशा नैराश्यपूर्ण वातावरणात बेरोजगार लोकांना थोडा आशेचा किरण आता दिसू लागलाय. ताडोबा व्याघ्र प्रकल्प येत्या एक ऑक्टोबरपासून सुरू होतोय. जुलैपासून इथे बफर क्षेत्रात पर्यटन सुरू होते, पण त्याला तुरळक प्रतिसाद असल्याने स्थानिकांना कोणताही आर्थिक लाभ होऊ शकलेला नाही. मात्र आता एक ऑक्टोबरपासून कोअर क्षेत्रातील पर्यटन सुरू केले जात असल्याने यावर आधारित लोकांमध्ये थोडे चैतन्य निर्माण झाले आहे.
18 मार्चपासून हा प्रकल्प कोरोना संकटामुळे बंद करण्यात आला. त्यामुळं एप्रिल, मे आणि जून हे सुगीचे तीन महिने वाया गेले. याच तीन महिन्यात इथे रिसॉर्ट, स्थानिक व्यवसाय तुफान चालतात. अवघ्या सहा महिन्यांच्या या व्यवसायात वर्षभराची बिदागी इथले लोक करीत असतात. पावसाळ्यात हा प्रकल्प तसाही तीन महिने बंद असतो. आणि हिवाळ्यात प्राणीविश्व फार दिसत नसल्याने पर्यटक फार येत नाही. त्यामुळे जानेवारी ते जून हे सहा महिनेच इथे आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे ताडोबासह इतरही पर्यटन क्षेत्र विकसित करून रोजगार उपलब्ध करणे गरजेचे आहेअसे बंडू धोतरे यानी सांगितले.
एक ऑक्टोबरपासून ताडोबा प्रकल्प सुरू होत असल्याने रिसॉर्ट, होम स्टे आणि स्थानिक दुकाने पुन्हा सुसज्ज करण्याचे काम सुरू झाले असून, जिप्सीमालकही वाहनांना तयार करीत आहेत. काळजी घेऊन हे सगळे करायचे आहे. त्यादृष्टीने ताडोबा व्यवस्थापनही सज्ज आहे. पर्यटक, रोसॉर्टमालक, जिप्सीचालक या सगळ्यांसाठी नियमावली तयार करण्यात आली असून, मास्क आणि सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आले आहे, असे राघवेंद्र मून यांनी सांगितले



























































