
टोळक्याने एका तरुणाला व त्याच्या मित्राला काठी व विटाने जबर मारहाण केली. नागरिकांना शिवीगाळ करून परिसरातील घरे व दुकानावर विटा फेकून दशहत निर्माण केल्याची घटना तळजाई पठार येथे घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्थ कदम (वय 20, रा. साई दत्तनगर, धनकवडी) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पार्थ सोमवारी दुपारी मित्रासोबत दुचाकीवरून घरी जात होता. त्यावेळी टोळक्याने त्यांना तळजाई पठार परिसरात अडविले. आरोपींपैकी एकाने पार्थला तू आमच्या घराची काच का फोडली, अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने काच फोडली नसल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपींनी पार्थ व त्याच्या मित्राला शिवीगाळ करून काठी व विटाने मारहाण करून जखमी केले. त्याठिकाणी जमलेल्या नागरिकांना देखील शिवीगाळ केली. कोणी आमच्या भांडणात मध्ये आले तर त्याला देखील सोडणार नाही, असे म्हणत विटा परिसरातील घरे व दुकानावर फेकले. त्यातील काही विटाचे तुकडे नागरिकांवर फेकले. त्यामुळे नागरिक भितीने आपल्या घरात जाऊन बसले. काही दुकानदारांनी भिती पोटी दुकाने बंद केली. त्यानंतर टोळके निघून गेले. या घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींचा माग काढण्यात येत असल्याची माहिती तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे यांनी सांगितले आहे.




























































