
अफगाणिस्तानातील तालिबानी संकटाच्या अनुषंगाने गुरुवारी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. तालिबानच्या धोक्याचा सर्वांनी एकजुटीने प्रतिकार करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. तालिबानने दोहा करारातील शब्द पाळला नाही. सत्तांतरासाठी केलेला शांततेचा करार तोडला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये अराजक माजले असून तेथील हिंदुस्थानींच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असा दावा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केला.
अमेरिकेतील सैन्याने माघार घेतल्यानंतर दहशतवादी तालिबान संघटना सक्रिय झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानची नेमकी रणनीती काय आहे, याची विस्तृत माहिती देण्यासाठी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. अफगाणिस्तानात अडकलेल्या अधिकाधिक लोकांना लवकरात लवकर तालिबान्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहे. हिंदुस्थानने 15 ऑगस्टपासून आतापर्यंत अफगाणिस्तानातील 800हून अधिक हिंदुस्थानींना सुखरूप मायदेशी आणले आहे. यासाठी ‘ऑपरेशन देवीशक्ती’अंतर्गत सहा विमानउड्डाणे सुरू आहेत. आम्ही निश्चितपणे अफगाणिस्तानात अडकलेल्या सर्व हिंदुस्थानींना मायदेशी आणू, असा निर्धार परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी बोलून दाखवला.
बैठकीला 31 पक्षांच्या 37 नेत्यांची उपस्थिती
- सर्वपक्षीय बैठकीला देशातील 31 राजकीय पक्षांचे 37 नेते उपस्थित होते. अफगाणिस्तानातील हिंदुस्थानींच्या सुरक्षेच्या मुद्दय़ावर सरकार आणि सर्व राजकीय पक्षांचे एकमत झाले. केंद्रीय मंत्री पियूष गोयल, प्रल्हाद जोशी यांच्यासह काँगेसचे नेते अधीर रंजन चौधरी, मल्लिकार्जुन खर्गे, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसचे नेते सौगत रॉय, सुखेंदू शेखर रॉय आदी वरिष्ठ नेत्यांनी बैठकीत सहभाग घेतला.





























































