
घरात सोने किंवा रोकड ठेवण्यापेक्षा आमच्याकडे ठेवा आणि मोबदल्यात चांगला परतावा मिळवा, अशी पद्धतशीर जाहिरातबाजी करून माहूलमधील अनेकांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या भामटय़ाला आरसीएफ पोलिसांनी शोधून काढले आहे. संतोष शिंदे असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल पाच किलो 20 ग्रॅम सोने व 39 लाख 68 हजारांची रोकड हस्तगत केली आहे.
संतोश शिंदे हा माहूल गाव परिसरात भिसी चालवायाचा. त्यामुळे त्या परिसरात त्याची चांगल्यापैकी ओळख होती. याचाच त्याने फायदा उचलला. राज फायनान्स नावाची आमची कंपनी असून तुम्ही घरात सोने अथवा रोकड ठेवण्यापेक्षा आमच्याकडे ठेवा आणि मोबदल्यात पैसे मिळवा, अशी जाहिरातबाजी करून त्याने हळूहळू करून सोन्याचे दागिने ठेवण्यास सुरुवात केली.
कोरोनामुळे त्याला नागरिकांना पैसे देणे कठीण झाले आणि त्याने आयडिया केली. नागरिकांचे दागिने व रोकड घेऊन संतोष पसार झाला. त्यामुळे संगीता माहूलकर या महिलेने त्याच्याविरोधात आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. शिवाय काही दिवसांनी आपला पती बेपत्ता असल्याची तक्रार संतोषच्या पत्नीने पोलिसांत दिली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ निरीक्षक घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संतोष कदम तसेच विकास हाके, हिवरे, गणेश निगडे, महेश राऊत या पथकाने तपास सुरू केला.
35 सराफांकडे दागिने गहाण ठेवले
पोलिसांनी तपास सुरू केल्यावर चिपळूण येथे राहणारी संतोषची पत्नी व त्याच्या नातेवाईकांकडून एकाच नंबरवर सतत कॉल होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मग त्या आधारे तांत्रिक बाबीचा अभ्यास करून कदम व पथकाने विलेपार्ले येथे एका कंपनीत प्यूनची नोकरी करून लपून राहत असलेल्या संतोष शिंदेला पकडले.
चौकशीत त्याने चेंबूर, मुलुंड, धारावी, भोईवाडा, भांडूप, ऍण्टॉपहिल, गोवंडी, शिवाजीनगर आदी 35 ठिकाणच्या सराफांकडे वेगवेगळी कारणे सांगून लोकांकडून घेतलेले सोने गहाण ठेवले होते. पोलिसांनी ते सर्व दागिने तसेच रोकड परत मिळवली.


























































