
कुख्यात नक्षलवादी आणि एक कोटींचे बक्षिस असणाऱ्या प्रशांत बोस आणि त्याची पत्नी शिला मरांडी यांना पोलिसांनी अटक केल्यामुळे नक्षली बिथरले आहेत. या पार्श्वभूमीवर नक्षलावद्यांनी ‘हिंदुस्थान बंद’ची हाक दिली होती. याचा सर्वाधिक प्रभाव झारखंडमध्ये पाहायला मिळत आहे. येथे शुक्रवारी रात्री नक्षलवाद्यांनी लातेहार जवळील रेल्वे रुळ उखडून टाकला.
झारखंडमधील लातेहार आणि टोरी रेल्वे स्थानकादरम्याचा रेल्वे रुळ नक्षलवाद्यांनी उखडला आहे. यामुळे रेल्वे गाड्यांचा प्रचंड खोळंबा झाला आहे. यासह चाईबासा येथेही नक्षलवाद्यांनी रेल्वे रुळ उखडण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून रेल्वे स्थानकांवर प्रवाश्यांची गर्दी दिसत आहे.
नक्षलवाद्यांनी शुक्रवारी रात्री 12 वाजल्यापासून ते शनिवारी रात्री 12 वाजेपर्यंत बंदची हाक दिली आहे. त्यामुळे झारखंडमधील पोलीस आणि प्रशासन सतर्क झाले आहे. जवानांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे असे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत.
मिलिंद तेलतुंबडेच्या मृत्यूमुळे बिथरले नक्षलवादी, सहा राज्यात पुकारला बंद
कोण आहे प्रशांत बोस?
प्रशांत बोस उर्फ किशन दा उर्फ मनीष उर्फ बुढा हा कुख्यात नक्षलवादी आहे. झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, ओडिसा आणि महाराष्ट्र या राज्यातील संघटनांचा तो प्रमुख आहे. तसेच तो झारखंड आणि बिहारमधील नक्षलवाद्यांचा सुप्रिम कमांडर आहे. 100 हून अधिक नक्षली कारवायांमध्ये त्याचा हात आहे. त्याच्यावर तब्बल एक कोटी रुपयांचे बक्षिस आहे. प्रशांत बोस याची पत्नीही नक्षल कारवायांमध्ये सक्रिय आहे. पोलिसांनी त्याला आणि त्याची पत्नी शिला मरांडी हिला 12 नोव्हेंबरला अटक केली होती. त्यामुळे नक्षलवादी बिथरले आहेत.
सहा राज्यात बंद
तत्पूर्वी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत 27 नक्षलवादी ठार झाले होते. यात नक्षल्यांचा कमांडर आणि 50 लाखांचे बक्षिस असणारा कुख्यात नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश होता. तेलतुंबडेसह आपल्या 27 साथिदारांना गमावल्याने नक्षलवादी बिथरले असून सहा राज्यात बंद पुकारला आहे. नक्षलवाद्यांनी पुकारलेला बंद सुरु झाला असून झारखंडमध्ये त्यांनी हैदोस घालायला सुरुवात केली आहे.




























































