महामार्गावरील जगबुडी पुलाच्या जोडरस्त्यांची दुरवस्था, खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदी पुलाच्या दोन्ही बाजूच्या जोडरस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे आणि जगबुडी पूल ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत रस्याची झालेली दुरवस्था यामुळे भरणे नाका परिसरात सतत वाहतुकीची कोंडी झाली. या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यांने येथील वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे.

मात्र, पर्यायी मार्गांबाबत सूचना देणारे दिशादर्शक फलक लावण्याची तसदी ठेकेदार कंपनीने घेतली नसल्याने वाहन चालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. भरणे नाका परिसरात रस्त्याची झालेली दुरवस्था पुलाच्या जोडरस्त्यांवर पडलेले खड्डे आणि वाहतुकीबाबत नसलेले नियोजन यामुळे या ठिकाणी एखादा भीषण अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. खेड तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या कशेडी घाटाचा पायथा ते परशुराम घाट या दरम्यानच्या 44 किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा ठेका कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रुक्चर या कंपनीने घेतला आहे. 44 किलोमीटरपैकी सुमारे 36 किलोमीटरच्या कामाचे क्रॉक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. या रस्त्यावरून वाहतूकही सुरु करण्यात आली आहे. मात्र हे काम करताना ठेकेदा कंपनीने अनेक त्रुटी ठेवल्या असल्याने महामार्गाचे चौपदरीकरण होऊनही अपघातांचा धोका कमी झालेला नाही.

महामार्गावर ज्या ठिकाणी मोऱ्या टाकण्यात आल्या आहेत त्या ठिकाणी रस्त्याची लेव्हल नाही. ज्या ज्या ठिकाणी नागमोडी वळणे आहेत त्या ठिकाणीही आवश्यक ती खबरदारी घेतली गेलेली नसल्याने अपघाताचा धोका कायम आहे. महामार्गावर जिथे वाहतूक वळविण्यात आली आहे तिथे कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक नाहीत, जिथे स्पीड ब्रेकर्स टाकण्यात आले आहेत तिथे ना सूचना फलक ना पांढरे पट्टे त्यामुळे स्पीडब्रेकर्सदेखील अपघातांचे कारण ठरत आहेत. स्पीड ब्रेकर्सवर आदळून अनेक वाहने नादुरुस्त होत आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्गाचे अधीकारी किंवा ठेकेदार कंपनी याना याबाबत काहीही सोयरसुतक नाही.

महामार्गावरील भोस्ते घाटाचे जेव्हा काम करण्यात आले तेव्हा या घाटात डोंगराची कटाई करण्यात आली त्यामुळे डोंगरावरील माती, दगड-गोटे सैल झाले. डोंगरावरील ही माती रस्त्यावर येऊ नये यासाठी आवश्यक ती उपाययोजना करायला हवी होती. मात्र संबंधित ठेकेदाराने डोंगरावरील दगड माती रस्त्यावर येऊ नये यासाठी कोणतीही खबरदारी घेतली नसल्याने पावसाळ्यात भोस्ते घाटात वारंवार दरड कोसळण्याची शक्यता नाकारत येत नाही. त्यामुळे पावसाळ्यात भोस्ते घाट पार करणे वाहन चालक आणि प्रवाश्यांसाही अतिशय धोक्याचे ठरणार आहे.

भरणे नाका येथे सुरू असलेले उड्डाण पुलाचे काम गेले अनेक वर्षे कूर्मगतीने सुरू आहे. पुलाचे काम रखडल्याने येथील व्यवसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शिवाय रहदारीचा बोजवारा उडालेलाच आहे. ज्या गतीने पुलाचे काम सुरू आहे ते पहिले तर अजून दोन वर्षे तरी हे काम पूर्ण होईल असे वाटत नाही त्यामुळे महामार्गाचे चौपदरीकरण हे कोकणवासियांसाठी शाप कि वरदान असे म्हणायची वेळ आली आहे.