
पाकव्याप्त कश्मीरवरील कारवाईचा प्रस्ताव संसदेत मंजूर झालेला आहे. आम्ही फक्त सरकारच्या आदेशाचीच वाट पाहत आहोत. सरकारचा आदेश मिळताच पाकव्याप्त कश्मीरवर कारवाई करण्यात येईल, असा बॉम्बगोळाच लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्ट. जन. उपेंद्र द्विवेदी यांनी टाकला आहे. पाकिस्तानने सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचे धाडस करू नये, त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त कश्मीरसंदर्भात सूचक विधान केले होते. याच विधानाचा धागा पकडून लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उकेंद्र द्विवेदी यांनी पुढील कारवाईचे स्पष्ट संकेत दिले. पाकव्याप्त कश्मीरसंदर्भात संसदेत प्रस्ताव मंजूर झालेला आहे. सरकारच्या आदेशाचे पालन करण्यासाठी लष्कर सज्ज आहे. आदेश येताच पाकव्याप्त कश्मीरवर तडाखेबंद कारवाई करण्यात येईल, असे लेफ्ट. जन. द्विवेदी म्हणाले.
सीमेवरील लाँचपॅड अतिरेक्यांनी ठासून भरले
हिंदुस्थानात घुसखोरी करण्यासाठी लाँचपॅडवर किमान 160 अतिरेकी तयार आहेत. पीर पंजालच्या शिबिरात 130 तर दक्षिणेकडच्या शिबिरात 53 अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत आहेत. याशिवाय पाकिस्तान ड्रग्जची तस्करी करण्याच्याही प्रयत्नात आहे. अलीकडेच सीमेवर काही अतिरेकी ठार मारण्यात आले. ते स्मगलर असल्याचे सांगण्यात आले. याचाच अर्थ पाकिस्तान अतिरेक्यांच्या माध्यमातून अमली पदार्थ हिंदुस्थानात पाठवत आहे. परंतु, याचा मुकाबला करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असा इशारा द्विवेदी यांनी दिला. 35 टक्के हे 20व्या वर्षीच अतिरेकी बनतात तर 55 टक्के तरुण 20 ते 30 या वयात अतिरेकी संघटनेत प्रवेश करतात. या तरुणाईला भरकटण्यापासून वाचवले पाहिजे, असे ते म्हणाले.
कलम 370 हटवल्यानंतर कश्मीर बदलले
कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-कश्मीरात प्रचंड बदल झाला आहे. राज्यात दहशतवादाला लगाम घालण्यात यश आले आहे. टार्गेट किलिंगसारखे प्रकार घडतात. त्यात निशस्त्र लोकांना निशाणा बनवण्यात येते. शस्त्रास्त्र पाठवण्यासारख्या घटनाही समोर येतात. परंतु, अतिरेक्यांचे मनसुबे आता आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे लेफ्ट. जन. उपेंद्र द्विवेदी यांनी ठणकावून सांगितले.





























































