
शहरातील नव्याने झालेल्या उड्डाणपुलावर वाहतूक सुरू होऊन एक महिनाही उलटलेला नाही. मात्र, नियमात नसलेल्या गतिरोधकांमुळे उड्डाणपुलावर रोजच अपघात होत होते. गतिरोधकांमुळे वाहतुकीचा खोळंबा तर होतच होता, त्याचबरोबर अनेक वाहनांचे अपघात होऊन त्यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी (दि. 29) एकाच दिवसात लागोपाठ दोन अपघात झाल्यानंतर रात्री उशिरा बांधकाम ठेकेदाराकडून हे गतिरोधक हटविण्यात आले आहेत.
नगर शहरातील उड्डाणपूल सुरू झाल्यापासून रोजच छोटे-मोठे अपघात होत आहेत. विशेष म्हणजे उड्डाणपुलावर गतिरोधकांमुळे अपघात होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतरही हे गतिरोधक काढण्याची तसदी बांधकाम ठेकेदाराने घेतली नाही. उड्डाणपुलावर गतिरोधकामुळे रोजच अपघात होत आहेत. मात्र, तरीही प्रशासन ढिम्म असून, नागरिकांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाल्यामुळे अनेक लोकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
उड्डाणपुलावर नियमात नसलेले गतिरोधक काढावेत, अशी मागणी अनेक संघटनांनी केली. मात्र, बांधकाम विभागाने त्यांच्या निवेदनांना केराची टोपली दाखवली. मंगळवारी (दि. 29) सायंकाळी सहाच्या सुमारास पुन्हा एसबीआय चौकाकडून अशोका हॉटेलकडे येणाऱ्या वळणावर उड्डाणपुलावरील गतिरोधकामुळे तीन वाहनांची धडक झाली. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी कोतवाली पोलीस आणि भिंगार कॅम्प पोलीस पोहोचले होते. मात्र, या अपघातामुळे नगर-संभाजीनगर महामार्गावर थेट राज चेंबर्सपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यानंतर रात्री पुन्हा अपघात झाला. या संदर्भात नगरकरांनी सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला. अखेर लागोपाठ दोन अपघात झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि रात्री उशिरा या उड्डाणपुलावरील नियमात नसलेले गतिरोधक काढण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात आली. रात्री उशिरा जेसीबीच्या साहाय्याने उड्डाणपुलावरील गतिरोधक अखेर काढण्यात आले आहेत.
उड्डाणपुलाखालील रस्त्याची कामे मार्गी लावा
शहरातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाला असून, या पुलाखालील रस्त्यावर अपूर्ण असलेल्या विविध कामांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी केली. ही कामे तातडीने मार्गी लावण्याबाबत यावेळी चर्चा झाली. उड्डाणपुलावरील वाहतूक सुरळीत झाली असली तरी उड्डाणपुलाखालील रस्ताही वाहतुकीसाठी व्यवस्थित असणे आवश्यक आहे. या रस्त्याखालील भूमिगत पाइपलाइन, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक साईड गटार तसेच इतर कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मनपा अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने ही कामे पूर्ण करणार आहे. यावेळी उपायुक्त श्रीनिवास कुऱहे, नगर रचनाकार राम चारठाणकर, शहर अभियंता सुरेश इथापे, शाखा अभियंता श्रीकांत निंबाळकर, अतिक्रमण व पाणीपुरवठा विभागप्रमुख अभियंता रोहिदास सातपुते आदी उपस्थित होते.

























































