
तालुक्यातील गवशी येथील धामणी नदीवर शेतकऱयांनी सिंचनासाठी घातलेला बंधारा शनिवारी फुटला. यामुळे शेकडो एकर जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवाहाचे पाणी शेतात घुसल्याने नदीकाठची जमीन खचून वाहून गेली. शेतकऱयांच्या पाणी उपसा पंपांसह शेतीपिकाचेही प्रचंड नुकसान झाले. दरम्यान, महसूल आणि कृषी विभागाकडून नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
गावकामगार तलाठी संदीप हजारे, ग्रामसेवक समीर ठिकपुर्ले, कृषी सहायक तानाजी परीट, कोतवाल सुनील हुंबे आदींनी नुकसानग्रस्त शेती व पिकांचे पंचनामे केले. नुकसानग्रस्त शेतकऱयांना किती आणि कधी भरपाई मिळणार, याकडे शेतकऱयांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, याचठिकाणी नवीन बंधारा बांधायचा झाल्यास शेतकऱयांना पुन्हा पैसे जमा करावे लागणार असून, आर्थिक अडचणीत वाढ होणार आहे. बंधाऱयात पुन्हा पाणीसाठा होणार का, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, पाटबंधारे विभागाच्या चुकीच्या धोरणांमुळे बंधारा फुटला, यावर शेतकरी ठाम असून, पाटबंधारे खात्याने हा बंधारा घालून द्यावा, अशी शेतकऱयांची मागणी आहे.
































































