रात्री घरफोडी करणारे त्रिकुट अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रात्रीच्या वेळेस घरफोडी करणाऱया त्रिकुटाला दहिसर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. गणेश पटेल, रामा रघू बनगर, हसनअली अबूबकर शेख अशी त्यांची नावे आहेत. जेलमध्ये असताना त्या तिघांची ओळख झाली होती. त्यानंतर ते तिघे एकत्र चोऱया करू लागले. तिघांच्या अटकेने सहा गुह्यांची उकल झाली आहे.

दहिसर पूर्व येथे तक्रारदार राहतात. गेल्या आठवडय़ांत रात्री अज्ञात चोरटय़ाने त्यांचे घर फोडले. दागिने आणि पैसे घेऊन पळ काढला. हा प्रकार लक्षात येताच  दुसऱया दिवशी सकाळी  दहिसर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला. परिमंडळ 12च्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक संजय बांगर, सहायक निरीक्षक रणजित चव्हाण आदी पथकाने तपास सुरु केला. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेज मध्ये एक जण चेहऱयावर मास्क आणि हुडी घातलेला दिसला. त्याची चालण्याची पद्धत ही गणेशसारखी होती. त्यावरून तपासाची चक्रे फिरली.

पोलिसांना गणेशची माहिती मिळाली. बोईसर येथून गणेश, हसनअली आणि रामाला पोलिसांनी ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्या तिघांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. गणेश हा काही वर्षं दहिसर पूर्व येथे राहिला होता. त्यामुळे त्याला दहिसर परिसरातील चाळींची माहिती आहे. ही टोळी रात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत घरफोडय़ा करते. अवघ्या काही मिनिटांतच ते घर साफ करतात.   ते तिघे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. काही वर्षांपूर्वी त्या तिघांची जेलमध्ये ओळख झाली होती.