
अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीच्या अहवालामुळे सुरू झालेल्या अदानी समूहातील शेअर्सची घसरण आज अर्थसंकल्पाच्या दिवशीही कायम होती. अदानी समूहाचे शेअर्स 6 टक्क्यांनी घसरले. मात्र अर्थसंकल्पाचा इतर कंपन्यांच्या शेअर्सवर सकारात्मक परिणाम होऊन त्यांच्या निर्देशांकात वाढ झाली. गौतम अदानी यांनी हिंडेनबर्ग अहवालाला 413 पानांचे प्रत्युत्तर देऊनही शेअर्समधील घसरण कायम आहे.
अर्थसंकल्पाच्या दिवशी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर आज इंट्राडेमध्ये 6 टक्क्यांनी घसरला आणि 2 हजार 800 रुपयांपर्यंत खाली आला आहे. मंगळवारी हा शेअर 2 हजार 974 रुपयांवर बंद झाला होता. कंपनीचा एफपीओ 112 टक्के भरल्यानंतर 31 जानेवारी रोजी बंद झाला. गैर-संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव भाग 3.32 पट भरला गेला, तर पात्र संस्थात्मक भागिदारांसाठीचा राखीव भाग 126 टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव भाग 12 टक्के भरला गेला.
या शेअर्समध्ये घसरण
अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर्स 6 टक्क्यांनी घसरून तो 1 हजार 151 रुपयांवर पोहोचला. अदानी पोर्ट्सचा शेअर्स 3 टक्क्यांनी घसरून 594 रुपयांवर पोहोचला. अदानी टोटल गॅस लोअर सर्किटमध्ये 10 टक्क्यांनी घसरून 1 हजार 897 रुपयांवर पोहोचला. एनडीटीव्हीमध्ये 4 टक्क्यांची घसरण होऊन 238 रुपयांवर पोहोचला.


























































