
संधी मिळेल तेव्हा लक्षवेधी कामगिरी करूनही ‘चायनामन’ फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला सातत्याने टीम इंडियातून डावलले जाते. इतर फिरकीपटूंच्या तुलनेत फलंदाजीत थोडा कमी असलेला कुलदीप गोलंदाजीत मात्र आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवतोय.
आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळण्यासाठी हा गुणी गोलंदाज बाकावर बसून संधीची वाट बघतोय. मायदेशात कुलदीप यादवला संधी मिळेल असे वाटत होते, मात्र नागपूर कसोटीत कर्णधार रोहित शर्माने अश्विन व जाडेजा या फिरकी जोडगोळीच्या जोडीला आणखी एक अष्टपैलू गोलंदाज असलेल्या अक्षर पटेलला खेळविले. गोलंदाज म्हणून कुलदीप हा अक्षरपेक्षा नक्कीच सरस आहे, मात्र अक्षर फलंदाजीत वरचढ आहे.





























































