
बेळगावसह सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव व्हावा म्हणून देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई, महाराष्ट्रातून भाजपच्या फौजा पाठवल्या आहेत, तिथे ठाण मांडून बसले आहेत. यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पैसा गेला आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचाराला शिवसेना परंपरेने जात असते. बेळगावसह कारवार, निपाणी, भालकी हा भाग महाराष्ट्रात यायलाच हवा असे जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा तिथल्या मराठी जनतेच्या पाठिशी उभे राहणे आमचे कर्तव्य आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी बेळगावात जाऊन सीमाबांधवांचा प्रचार करावा. मुख्यमंत्री मी बेळगावच्या लढ्यात होतो, तुरुंगवास भोगला म्हणतात. जर खरंच तुरुंगवास भोगला असेल, बेळगावच्या लढ्याची जाणीव असेल तर मुख्यमंत्र्यांनी सर्व बंधने झुगारून बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचाराला जावे, असे आव्हानही राऊत यांनी दिले.
ते पुढे म्हणाले की, आम्ही प्रचारासाठी निघालो आहोत, आमची निष्ठा, कमिटमेंट आहे. सीमाप्रश्नासाठी शिवसेनेने 70 हुतात्मे दिले, बाळासाहेबांनी तुरुंगवास भोगला. त्यामुळे आम्ही मराठी बांधवांशी बेईमानी करणार नाही. माझ्यावर बेळगाव पोलिसांचे वॉरंट आहे. त्यामुळे बेळगावात उतरल्यानंतर सर्वात आधी मला कोर्टात हजर रहावे लागेल आणि मग तिथून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढच्या कार्यक्रमांना जावे लागेल. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी इथे बसून सुस्कारे सोडू नये. बेळगावच्या लोकांविषयी किंवा राज्यपालांनी भाषणात सीमाभाग आमचाच हे बोलून उपयोगाचे नाही. सीमाभागातील मराठी जनतेच्या पाठिशी संकटकाळी उभे राहण्याची हिंमत तुम्ही दाखवणार नसाल तर सर्व व्यर्थ आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.
मुख्यमंत्री बेळगाव किंवा कर्नाटकात भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी जाणार असल्याचे वृत्त आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, त्यांनी कर्नाटकात जाऊन माती खावी किंवा अन्य काही खावे. त्यांनी कोणाचाही प्रचार करावा. आमची भूमिका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार करावा ही आहे. महाराष्ट्रात येण्यासाठी ते 70 वर्षापासून संघर्ष करत आहेत. लढा देताहेत, तुरुंगवास भोगताहेत, गोळ्या खाताहेत. तुम्ही जर स्वत:ची शिवसेना खरी म्हणत असेल तर बेळगावच्या मराठी जनतेशी गद्दारी करू नका. तुमच्या रक्तात गद्दारीचे रक्त भिनले असेल तर मात्र तुम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार कराल, असा टोलाही राऊत यांनी लगावला.






























































