
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीत गेले होते, ते काय स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी? या दोघांनी पंतप्रधानांना महाराष्ट्रातील मराठा आंदोलनाची स्पष्ट कल्पना दिली नाही, अशी दाट शंका आहे. महाराष्ट्रात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मराठा आरक्षणाबद्दल चकार शब्द बोलले नाहीत. आमच्या मनात पंतप्रधानांबद्दल कोणताही वैरभाव नाही, तसे असते तर त्यांचे विमानच उतरू दिले नसते. मराठा समाजामध्ये तेवढी ताकद आहे, असा तिखट हल्ला मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांनी केला.
आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले असून, आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता. पंतप्रधान शिर्डी दौऱयात मराठा आरक्षणावर बोलतील अशी अपेक्षा होती. परंतु त्यांनी याबाबतीत मिठाची गुळणी धरली,असे ते पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. पंतप्रधानांबद्दल आमच्या मनात कोणताही वैरभाव नाही. तसे असते तर मराठय़ांनी त्यांचे विमान उतरूच दिले नसते, तेवढी ताकद मराठय़ांमध्ये आहे, असे खडे बोलही त्यांनी सुनावले.
मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या न्या. शिंदे समितीला कुणाला विचारून ही मुदतवाढ देण्यात आली? मुळात ही समितीच आम्हाला मान्य नाही, असे त्यांनी पुन्हा ठणकावून सांगितले.
मनोज जरांगे यांचे सरकारला प्रश्न
n मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकार विशेष अधिवेशन घेणार आहे का?
n दिल्लीत पंतप्रधानांच्या कानावर मराठा आरक्षणाचा विषय घातला होता का?
n नेमलेल्या समितीला सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करणार का?
n 1967पासून विविध जातींना कोणत्या पुराव्याच्या आधारे आरक्षण देण्यात आले आहे?
n आरक्षणातील जातींचे दहा वर्षांनंतर सर्वेक्षण करणे गरजेचे होते. असे सर्वेक्षण झाले आहे का? n चार वर्षांत 14 टक्क्यांचे आरक्षण 36 टक्के कसे झाले? त्याचा आधार काय आहे?
n आतापर्यंत किती उपजाती, पोटजाती आरक्षणात घालण्यात आल्या, त्यासाठी कोणते पुरावे तपासले?
…तर असे मुख्यमंत्री नकोच
डोंबिवली ः मराठा समाजाचा मुख्यमंत्री असतानाही जर पोलिसांकडून मराठय़ांना नोटिसा दिल्या जात असतील तर असले मुख्यमंत्री आम्हाला नकोच, अशा शब्दांत मिंधे गटाच्या पदाधिकाऱयानेच सणसणीत लगावली आहे. कल्याणमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. या वेळी मिंधे गटाचे पदाधिकारी अरविंद मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच खडे बोल सुनावले. सरकारने लवकरात लवकर आरक्षण दिले नाही तर मी पदाचा राजीनामाच देईन, असेही मोरे म्हणाले.
































































