
मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित 62 व्या मुंबई व्यावसायिक जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत पुरुष व्यावसायिक गटात मध्य रेल्वे, महिला व्यावसायिक गटात पश्चिम रेल्वे, तर 4 फूट 11 इंच प्रायोगिक गटात यजमान विद्यार्थी क्रीडा केंद्राने जेतेपद पटकावले.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात मध्य रेल्वेने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पश्चिम रेल्वेचा 2.40 मिनिटे राखून 13-12 असा 1 गुणाने पराभव केला. मध्य रेल्वेच्या विजयात रामजी कश्यप, दिलीप खांडवी, मिलिंद चावरेकर, विजय हजारे, अर्णव पाटणकर यांनी निर्णायक योगदान दिले. तर पराभूत पश्चिम रेल्वेकडून महेश शिंदे, ऋषभ वाघ, निखिल सोडये, राहुल मंडल, मझहर जमादार यांनी दिलेली झुंज अखेर अपुरी ठरली.
महिलांच्या अंतिम सामन्यात पश्चिम रेल्वेने आक्रमक खेळाचे दमदार प्रदर्शन करत रचना नोटरी वर्क्सचा 6-4 असा एक डाव राखून 2 गुणांनी दणदणीत धुव्वा उडवत पराभव करत
अजिंक्यपदावर आपले नाव कोरले.
4 फूट 11 इंच मुलांच्या प्रायोगिक निमंत्रित अंतिम सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने ओम साईश्वर सेवा मंडळावर 5-5 (पूर्वार्ध 2-2, उत्तरार्ध 1-1, जादा डाव 2-2) अशी बरोबरी झाल्यानंतर लघुत्तम आक्रमणात 4.49 मिनिटे राखून थरारक विजय मिळवला. विद्यार्थी क्रीडा केंद्राकडून विग्नेश जाधव, ओमकार जाधव, कार्तिक चोडणकर यांनी विजयात सिंहाचा वाटा उचलला, तर पराभूत ओम साईश्वरकडून सार्थक गामी, आरव साटम, श्लोक जाधव यांनी शेवटपर्यंत झुंज दिली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण विद्यार्थी क्रीडा केंद्राचे अध्यक्ष गजानन वाईरकर, बाळ नाईक, पराग आंबेकर, ऍड. अरुण देशमुख, सुरेंद्र विश्वकर्मा यांच्या हस्ते पार पडला.





























































