जीवघेणी वळणे, अरुंद मार्ग, चौपदरीकरण लटकले; मनोर-पालघर रस्ता बनला डेंजरझोन, रोज जीव मुठीत धरून प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

जीवघेणी वळणे, अरुंद रस्त्यासह चौपदरीकरणाचे काम लटकल्याने मनोर-पालघर रस्ता हा डेंजरझोन बनला आहे. जव्हार, मोखाडा, वाडा, तलासरी तसेच डहाणूच्या अति दुर्गम भागातील गावांना जोडणारा हा एकमेव मुख्य रस्ता असून सुरक्षेच्या दृष्टीने तेथे कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे जीवघेण्या रस्त्यावरून पालघरवासीयांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. एखादी मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

१ ऑगस्ट २०१४ मध्ये स्वतंत्र पालघर जिल्ह्याची घोषणा झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्व शासकीय व प्रशासकीय आस्थापने उभारण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील ग्रामस्थांची फरफट काही प्रमाणात कमी झाली. शासकीय व खासगी आस्थापने, प्रशस्त रुग्णालय, महाविद्यालय व मुख्य बाजारपेठ पालघर शहरात असल्यामुळे विद्यार्थी, रुग्ण, गर्भवती महिला, शेतकरी व चाकरमान्यांना दररोज मनोर-पालघर मार्गाने ये-जा करावी लागते. मात्र हा मुख्य रस्ता अरुंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. तसेच रस्त्यावर दिशादर्शक फलक, पथदिवे नसल्याने सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. प्रशासनाने हा रस्ता चार पदरी करावा आणि धोकादायक नागमोडी वळणांची तीव्रता कमी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जव्हार, मोखाडा, वाडा, तलासरी, डहाणूतील शेकडो ग्रामस्थांचा हा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र मनोर -पालघर रस्ता अत्यंत धोकादायक बनल्यामुळे प्रवाशांसह रुग्णवाहिका, आपत्कालीन सेवा पुरवणाऱ्या वाहनांवरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे.

संतोष देशमुख, अध्यक्ष महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट