शिवरायांचा आठवावा प्रताप; चावणी उंबरखिंडीतील संग्रामाचा 365 वा विजय दिन सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वराज्यावर चाल करून आलेल्या कारतलब खानाच्या ३० हजार मुघल सैन्यावर मराठ्यांनी प्रचंड मोठा हल्ला करून त्यांची दाणादाण उडवलेल्या चावणी उंबरखिंडीतील संग्रामाचा ३६५ वा विजय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप असा जयघोष करत खालापूरवासीयांनी चावणी उंबरखिंडीतील विजयस्तंभाला सलामी दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषाने शिवभक्तांनी परिसर दणाणून सोडला.

इ.स. १६६१ मध्ये मुघलांचा सेनापती कारतलब खान ३० हजार मुघलांची फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा करत मूठभर मावळ्यांना घेऊन चावणीच्या उंबरखिंडीत मुघलांच्या सैन्याला गाठले. त्यांच्यावर तुफान हल्ला चढवला आणि मुघल सैन्याचा दारुण पराभव करत मराठ्यांच्या शौर्याची पताका चावणीच्या उंबरखिंडीत फडकवली.

या विजयाचा ३६५ वा विजय दिन उंबरखिंडीत साजरा करण्यात आला. उंबरखिंडीत उभारलेल्या विजयस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. ग्रामपंचायत चावणी, पंचायत समिती खालापूर आणि शिवदुर्ग मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवशाहीर रायगड भूषण वैभव घरत यांनी पोवाडे सादर केले तर शिवव्याख्याते अॅड. विनय दाभाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर व्याख्यान दिले.