मनोरुग्णालयातील विस्मृतीचा अंधार सरला.. आयुष्याची नवी पहाट! 2 हजार 384 मनोरुग्णांना मिळाली घरची माया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनोरुग्ण म्हटला की घरच्यांसहित समाजाचाही बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो, पण विस्मृतीचा आधार, एकाकीपणा नष्ट होऊन त्यांच्या आयुष्यात वेगळी पहाट उगवू शकते हे ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाने दाखवून दिले आहे. गेल्या वर्षभरात या रुग्णालयातून ठणठणीत बरे झालेले २ हजार ३८४ रुग्णांना पुन्हा घरची माया मिळाली आहे. पूर्वी मनोरुग्ण असलेली कुणाची आई, कुणाची बहीण तर कुणाचा भाऊ बरे होऊन जेव्हा घरी परतले तेव्हा सर्वांच्या डोळ्यातून वाहू लागले ते फक्त आनंदाश्रू. मनोरुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी यांनी उपचारांबरोबरच माणुसकीचा हात पुढे करून मनोरुग्णांना नवे आयुष्य देऊन माणुसकीचाच धर्म जपल्याचे दिसून आले आहे.

ठाण्याच्या मनोरुग्णालयात राज्याच्या विविध भागातून शेकडोंच्या संख्येने मनोरुग्ण उपचार घेत असतात. अनेक वेळा रुग्ण बरे होऊनही घरचे नातेवाईक त्यांना स्वीकारण्यास टाळाटाळ करतात. मनोरुग्णाला घरी ठेवले तर समाज काय म्हणेल या न्यूनगंडतेने त्यांना पछाडलेले असते, पण प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी पुढाकार घेऊन रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांचेदेखील समुपदेशन केले. त्यानंतर घरातील लोकांनीदेखील उदार अंतःकरणाने त्यांना स्वीकारले. जानेवारी २०२५ ते या वर्षीच्या जानेवारीपर्यंत सर्व संकटांवर मात करून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी २ हजार २५७कुटुंबांचे समुपदेशन करून रुग्णांना पुन्हा घरचा उंबरठा ओलांडण्याची संधी मिळवून दिली.

  • ४४ अज्ञात रुग्णांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या मूळ गावी व कुटुंबात पोहोचवण्यात रुग्णालयाल 1 यश आले, तर काही रुग्ण इतक्या वर्षांपासून रुग्णाल यात होते की त्यांना घरचा रस्तादेखील आठवत नव्हता.
  • ३४ दीर्घकालीन रुग्णांना डॉक्टर आणि कर्मचारी स्वतः ‘एस्कॉर्ट’ बनून सुरक्षितपणे त्यांच्या घरी घेऊन गेले. ज्यांचे कोणीही नातेवाईक उरले नाहीत, ज्यांना स्वीकारायला कोणीच पुढे आले नाही, अशा ४९ निराधार रुग्णांना सन्मानाने पुनर्वसन केंद्रात दाखल केले आहे.