
>> स्पायडरमॅन
लवकरच इंग्रजी नववर्षातले पहिले सूर्यग्रहण होणार आहे. 17 फेब्रुवारी रोजी ग्रहण असून, हिंदुस्थानात मात्र हे ग्रहण दिसणार नाही. अमेरिका, अर्जेंटिना, आफ्रिका आणि अंटार्क्टिकाच्या काही भागात हे ग्रहण अनुभवता येईल. सध्या या ग्रहणासंदर्भात अनेक रोचक चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. ग्रहणाचे मनुष्याप्रमाणे प्राणीसृष्टीवरदेखील काही परिणाम होतात का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ह्या विषयातले अभ्यासक, प्राणीप्रेमी ह्या प्रश्नाचे उत्तर देताना खूप रोचक, अशी माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.
ग्रहणाच्या काळात अनेक प्राणी आणि पक्ष्यांच्या वागण्यात विचित्र फरक जाणवतो. अचानक अंधार पडल्याने अनेक पक्षी गोंधळतात आणि आपापल्या घरटय़ात अथवा झाडांवर विश्रांतीला धावतात. काही वाटदेखील चुकतात. मात्र काही वेळातच अचानक सर्वत्र उजाडल्याने त्यांचा पुन्हा गोंधळ उडालेला पाहायला मिळतो. काsंबडय़ा या प्राण्याचा यासंदर्भात एक विशेष अनुभव सांगितला जात आहे. उजाडले रे उजाडले की बांग देण्याची काsंबडय़ाला सवय असते. ग्रहण संपल्यानंतर अचानक उजेड झाला की सकाळ झाली असे समजून अनेक काsंबडे आरवायला सुरुवात करतात.
अंधार पडल्यानंतर सर्व पक्षी घरट्याकडे परततात, तर वटवाघळासारखे पक्षी रात्र झाल्याचे समजून कार्यरत होतात. रातकिडेदेखील त्यांच्या विशिष्ट आवाजात घुमायला लागतात. सायन्स अलर्टमध्ये दिलेल्या अभ्यासानुसार ग्रहण काळात काही खास प्रजातींचे कोळी हे अत्यंत अस्वस्थ होताना दिसतात. ते स्वतः विणलेले जाळेदेखील तोडून टाकतात. मात्र प्रकाश परतला की पुन्हा जाळे विणायला सुरुवात करतात. 2017 मध्ये अमेरिकेत ग्रहणकाळात एका पशू पक्षी संग्रहालयात खास अभ्यास करण्यात आला. त्यावेळी जवळपास 75 टक्के प्राण्यांवर ग्रहणाचा स्पष्ट परिणाम जाणवला. जिराफ अचानक इकडे तिकडे धावू लागले तर नर आणि मादी कासवांनी एकत्र येण्यास सुरुवात केली. ग्रहण काळात पृथ्वीच्या काही भागात तापमानातदेखील वाढ किंवा घट होत असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे.






























































