
अमेरिकेच्या ईशान्य भागात सोमवारी धडकलेल्या भीषण हिमवादळाने (Snowstorm) मेरीलँडपासून मेनपर्यंतच्या राज्यांना अक्षरशः गोठवून टाकले आहे. वेगवान वारे आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे लाखो नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले असून वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. अनेक ठिकाणी व्यवसाय आणि शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हवामान शास्त्रज्ञांच्या मते, हे गेल्या दशकातील सर्वात शक्तिशाली हिमवादळ आहे. ईशान्येकडील महानगरांमध्ये २ फुटांहून अधिक (६० सेंमी) बर्फ साचला असून अनेक वर्षांचे रेकॉर्ड मोडले गेले आहेत. या परिस्थितीमुळे संयुक्त राष्ट्रांना (UN) सुरक्षा परिषदेची महत्त्वाची बैठक देखील पुढे ढकलावी लागली. न्यूयॉर्क शहरात तब्बल सहा वर्षांनंतर शाळांना ‘स्नो डे’ची सुटी देण्यात आली.
बॉम्ब सायक्लोनचा फटका
नॅशनल वेदर सर्व्हिसने या वादळाचे वर्णन ‘क्लासिक बॉम्ब सायक्लोन’ (Bomb Cyclone) असे केले आहे. जेव्हा २४ तासांच्या आत वादळाचा दाब झपाट्याने कमी होतो, तेव्हा अशा प्रकारचे शक्तिशाली वादळ निर्माण होते. दरम्यान, येत्या काही दिवसांत आणखी एका वादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कुठे किती बर्फ?
न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये १९ इंच बर्फाची नोंद झाली, तर र्होड आयलंडमधील वॉरविक येथे सर्वाधिक ३ फुटांहून अधिक बर्फ साचला आहे. नॅनटकेटमध्ये ताशी १३३ किमी वेगाने वारे वाहत होते. कनेक्टिकटमधील ऐतिहासिक जहाजांचे रक्षण करण्यासाठी कर्मचारी मशिनरीऐवजी हाताने बर्फ साफ करत आहेत, जेणेकरून लाकडी जहाजांचे नुकसान टाळता येईल.
विमान वाहतूक आणि रेल्वे ठप्प
या हिमवादळामुळे सोमवारी ५,६०० हून अधिक विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर मंगळवारच्या २,००० फेऱ्या आधीच रद्द केल्या गेल्या आहेत. न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि बोस्टन विमानतळांना याचा सर्वाधिक फटका बसला. न्यूयॉर्कमधील मेट्रो आणि बस सेवा अंशतः सुरू असली तरी अनेक मार्गांवर विलंब होत आहे.
प्रशासनाचे आवाहन आणि राजकारण
अनेक राज्यांनी आणीबाणी घोषित केली असून बेघर लोकांना निवारा केंद्रात हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, शाळा सुरू करण्याच्या मुद्द्यावरून न्यूयॉर्कमध्ये राजकारणही रंगले आहे. महापौर जोहरान ममदानी यांनी मंगळवारपासून शाळा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत, मात्र रस्त्यांवरील बर्फ पाहता शिक्षक संघटना आणि इतर नेत्यांनी याला विरोध केला आहे.
Massive Snowstorm Hits US: 5,600 Flights Cancelled, Schools Shut in Northeast
A powerful bomb cyclone paralyzes the US Northeast, causing over 5,600 flight cancellations, record-breaking snowfall in NYC, and widespread power outages.































































