
मागील 13 वर्षे वेदनादायी जगण्याशी झुंज देणाऱ्या हरीश राणाचा अखेर मंगळवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात मृत्यू झाला. हरीशने अपघातानंतर झालेल्या आघातामुळे तीव्र वेदना सोसल्या होत्या. मृत्युशय्येवर असतानाची त्याची गंभीर स्थिती पाहून सर्वोच्च न्यायालयाने त्याला इच्छामरणासाठी परवानगी दिली होती. त्यानुसार एम्स रुग्णालयात त्याचे उपचार हळूहळू बंद करण्यात आले होते.
एम्स रुग्णालयाने हरीश राणाचा मृत्यू झाल्याचे आज घोषित केले. हरीशच्या इच्छामृत्यूसाठी त्याच्या आई-वडिलांनी कायदेशीर लढा दिला होता. त्यांनी पालक म्हणून मुलाच्या केलेल्या पालनपोषणाला दाद देत सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदाच इच्छामरणाला परवानगी दिली होती. हरीशची आयुष्यातील 13 वर्षे कोमामध्ये गेली. त्याला 14 मार्च रोजी घरातून एम्स रुग्णालयात हलवले होते. मागील दहा दिवस 10 सदस्यीय डॉक्टरांचे पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. अखेर मंगळवारी हरीशने अखेरचा श्वास घेतला. यादरम्यान त्याची आई रुग्णालयातच हनुमान चालिसा म्हणत होती. हरीशला मागील सहा ते सात दिवसांपासून अन्न देण्यात आले नव्हते. त्याला वेदनारहीत मृत्यू मिळावा यासाठी संपूर्ण प्रक्रिया पार पाडली होती.

























































