
म्हाडा घोटाळ्याशी संबधित तक्रार दाखल करूनही गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करणारे अधिकारी सत्र न्यायालयाच्या रडारवर आले आहेत. कथित घोटाळ्याप्रकरणी एफआयआर दाखल न केल्याने मुंबई सत्र न्यायालयाने माजी पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात समन्स जारी करण्याचे आदेश दिले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शेणॉय यांनी 2017 मध्ये म्हाडातील घोटाळय़ाप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यांनी केलेल्या आरोपानुसार मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये खासगी विकासकांनी अतिरिक्त चटईक्षेत्र म्हाडाला दिले नाही. यामध्ये सुमारे 14 हजार कोटी रुपयांचे सरकारचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. या घोटाळय़ाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पोलिसांकडे वारंवार करूनही तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱयांनी एफआयआर नोंदवला नाही. याप्रकरणी सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावर न्यायाधीश मुजाबुद्दीन शेख यांच्यासमोर नुकतीच सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने एवढय़ा मोठय़ा तक्रारीवर दोन वर्षांहून अधिक काळ केवळ चौकशी सुरू असल्याचे सांगून एफआयआर टाळणे हे कर्तव्यात कसूर असल्याचे सुनावत पोलिसांना फटकारले.



























































