
मीसुद्धा आयुष्यात खुप काही गमावलं, स्वतःसाठीही काही करू शकले नाही अशा शब्दांत भाजप नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे.
गुरुवारी मनोहर थाना येथे आयोजित जनसंपर्क यात्रेत वसुंधरा राजे आपल्या पुत्र दुष्यंत सिंह यांच्यासह सहभागी झाल्या होत्या. या वेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करत आपल्या मतदारसंघातील लोकांशी असलेल्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला.
त्या म्हणाल्या, “तुम्ही माझ्यावर प्रेम आणि माझ्यावरचा विश्वास कायम ठेवा. अशा छोट्या-छोट्या अडचणी येतच राहतात—कधी कोणाचं घर होत नाही, कोणाला पेन्शन मिळत नाही, तर कोणाला भरपाई मिळत नाही. कोणाला मिळतं, कोणाला नाही—असं होतच राहतं. पण आपण सगळे मिळून या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू.”
यावेळी त्यांनी वैयक्तिक अनुभवही शेअर केला. “मी स्वतःसाठीही काही करू शकले नाही, आयुष्यात अनेक गोष्टी गमावल्या,” असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
2023 साली राजस्थानमध्ये भाजपला बहुमत मिळालं होतं. तेव्हा वसुंधरा राजे पुन्हा मुख्यमंत्री होतीला असा अंदाज होता. पण एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी वसुंधरा राजे यांना चिठ्ठी दिली. त्यात चिठ्ठीत राजस्थानच्या भावी मुख्यमंत्र्याचे नाव होते. त्या चिठ्ठीतले नाव वाचताच वसुंधरा राजे चकित झाल्या होत्या आणि या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.
























































