ज्ञानाचे प्रतीक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. डॉ. संजय हिराजी खैरे

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील दीनदलित, पददलित यांच्यासाठी लढा दिला. सर्व दलित-पददलितांना सन्मानाने जगण्याचा मार्ग खुला केला. त्यामुळेच सन्मानाने आज भारतातील दीनदलित आपले जीवन जगत आहेत, परंतु यासाठी अतिशय खडतर असा प्रवास त्यांना करावा लागला. अगदी विद्यार्थीदशेपासून संघर्षमय जीवन जगावे लागले. त्यांच्या बालपणातील, विद्यार्थीदशेतील हा प्रसंग कोणत्याही सहृदयी माणसाच्या हृदयाला पाझर पह्डल्याशिवाय राहणार नाही.

एके दिवशी वर्गामध्ये गुरुजी शिकवत असतानाच गुरुजींनी सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला की, ‘‘अशी कोणती गोष्ट आहे, जी तुम्हाला दिसते आहे, परंतु तुम्ही तिला स्पर्श करू शकत नाही.’’ तेव्हा एका विद्यार्थ्याने हात वर केला. गुरुजी म्हणाले, ‘‘सांग, अशी कोणती गोष्ट आहे की, जी तुला दिसते, परंतु तू स्पर्श करू शकत नाहीस.’’ तेव्हा तो विद्यार्थी म्हणाला, ‘‘ते आकाश मला इथून दिसते आहे, पण मी स्पर्श करू शकत नाही’’, दुसरा विद्यार्थी म्हणाला, ‘‘तो झाडाचा शेंडा मला खिडकीतून दिसत आहे, परंतु मी स्पर्श करू शकत नाही.’’ तिसरा विद्यार्थी म्हणाला, ‘‘हे वर्गाचे छत गुरुजी मला दिसत आहे, पण मी स्पर्श करू शकत नाही.’’ अस्पृश्यतेमुळे वर्गाबाहेर बसलेल्या विद्यार्थीदशेतील बाबासाहेबांनी हात वर केला.’’ गुरुजी म्हणाले, ‘‘अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला डोळ्यांनी दिसत आहे, परंतु तुम्ही तिला स्पर्श करू शकत नाही?’’ बाबासाहेब म्हणाले, ‘‘गुरुजी, तो फळ्याजवळ ठेवलेला पाण्याचा माठ मला इथून दिसत आहे. मला तहान लागली आहे, परंतु  मी त्या माठाला स्पर्श करू शकत नाही.’’ असे अत्याचार पचवून बाबासाहेब जगात एक विद्वान विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध झाले. ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ (ज्ञानाचे प्रतीक) म्हणून जगाने बाबासाहेबांचा गौरव केला.

‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ (ज्ञानाचे प्रतीक) म्हणून संपूर्ण जग आणि जगातील विद्यार्थी आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून स्फूर्ती घेत आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग अतिशय महत्त्वाचा आहे. देशातील दीनदलितांना सन्मानाने जीवन जगता यावे म्हणून शिक्षणाबरोबरच त्यांच्यात आमूलाग्र बदल करणारी एक ऐतिहासिक घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांच्या संमतीने केली ती म्हणजे आपल्या लाखो अनुयायांसह 14 ऑक्टोबर1956 रोजी बौद्ध धम्माची नागपूर येथे दीक्षा घेतली आणि शास्त्रशुद्ध धम्म दिला. त्यामुळेच आज पददलित माणसे स्वाभिमानाने आपले जीवन जगत आहेत. माणूस घडविण्याची जगात यापेक्षा दुसरी  कोणती मोठी क्रांती असू शकते?