
>> गोपाळ पवार
रायते पुलावर आज झालेले ११ प्रवाशांचे मृत्यू हे एसटी प्रशासनाची बेफिकिरी आणि वाहतूक पोलिसांच्या हप्तेखोरीचे बळी ठरले आहेत. ईको व अर्टिगासारख्या खासगी वाहनाने कल्याणहून मुरबाडला व मुरबाडहून कल्याणला अक्षरशः जीव धोक्यात घालून शेकडो जण रोज प्रवास करत आहेत. या खासगी गाड्यांमध्ये फक्त सात प्रवाशांना अधिकृत परवानगी असताना पैसे कमवण्यासाठी पंधराहून अधिक जणांची कोंबाकोंबी केली जाते. त्यामुळे कल्याण-मुरबाड मार्गावर दिवसेंदिवस मरण स्वस्त होत असून वाहतूक शाखेचे अधिकारी हे फक्त हप्तेखोरीमध्ये व्यस्त असल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले आहे.
कल्याण-मुरबाड मार्गावरील रायते पुलावर आज सकाळी प्रवासी व्हॅन व सिमेंट मिक्सर यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कल्याण-मुरबाड मार्ग डेंजर झोन बनला आहे. यापूर्वीही या मार्गावर अनेक अपघात झाले असून हजारो प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कल्याण ते मुरबाड व मुरबाड ते कल्याण यादरम्यान रोज असंख्य प्रवासी एसटीने प्रवास करतात. गेल्या काही वर्षांत मुरबाडची लोकसंख्या झपाट्याने वाढली असून त्यामानाने एसटी बसेस अपुऱ्या आहेत.
आणखी किती बळी घेणार?
- मुरबाडहून केवळ कल्याणसाठी नव्हे तर धसई, टोकावडे, सरळगाव, म्हसा या मार्गावर बेकायदेशीरपणे खासगी प्रवासी वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून रोज सुरू आहे. आज ११ जणांचा बळी गेला. आणखी किती जणांचे बळी तुम्ही घेणार आहात, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. कल्याण ते मुरबाड व मुरबाड ते कल्याण यादरम्यान एसटीची संख्या वाढवावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
- मुरबाड एसटी स्थानकात अनेक बसेस भंगार अवस्थेत असल्याने त्या धूळ खात पडून आहेत. गेल्या वर्षीं स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पाच नव्या बसेसचे उद्घाटन झाले होते. पण या बसेस अजूनही रस्त्यावर दिसत नाहीत.
बसेसच्या दुर्दशेमुळे दररोज मुरबाडकरांना खासगी इको व अर्टिगा गाड्यांतून जीवघेणा प्रवास करावा लागतो. कल्याणमध्ये स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून या गाड्या सुटतात. कल्याण ते मुरबाडदरम्यान 50 रुपये एवढे भाडे आकारले जाते. - मुरबाड तालुक्यात वर्षातून दोनदा आरटीओमार्फत गाड्यांची तपासणी केली जाते. पण मुरबाडचे पोटगाव, शहाड फाटक, घोलप नगरपूल आणि कल्याण येथे वाहतूक पोलिसांकडून सुरू असलेली हप्तेखोरी का दिसत नाही, असा सवाल प्रवाशांनी केला आहे.
























































